संदेशखालीतील महिलांची ममतांनी घेतली भेट ! भाजपवर अफवा पसरवत असल्याचा केला आरोप

नवी दिल्ली -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी संदेशखालीतील महिलांची भेट घेतली. त्या भेटीनंतर ममतांनी संदेशखालीविषयी भाजप अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.
बंगालच्या संदेशखालीतील काही महिलांवर तृणमूलच्या सदस्यांनी अत्याचार केल्याच्या आरोपाचे प्रकरण सध्या गाजत आहे. त्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा स्वीकारत तृणमूलला घेरण्याची रणनीती अवलंबली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बंगालचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी संदेशखालीतील पीडित महिलांची भेट घेऊन तृणमूलवर जोरदार टीकास्त्र सोडले.
त्यानंतर ममतांनी गुरूवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कोलकत्यात महिला हक्क रॅली काढली. त्यावेळी त्यांनी संदेशखालीतील महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. काही घटनांचा आधार घेऊन इतर पक्ष तृणमूलविषयी नकारात्मक प्रचार करत असल्याचा दावा त्या महिलांनी केला. त्यांनी तृणमूलला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे सुखावलेल्या ममतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित राज्य आहे. मोदी महिला सुरक्षेवरून बंगाल सरकारला लेक्चर देतात. मात्र, भाजपशासित राज्यांमधील महिला अत्याचाराविषयी ते मौन बाळगतात, असे त्या म्हणाल्या.





