Mallikarjun Kharge on RSS। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार असल्याने त्यावर पुन्हा बंदी घालण्यात यावी तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे,” असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या विधानाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी, “माझे वैयक्तिक मत असे आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी.”असे म्हटले. त्यासोबतच “देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जबाबदार आहेत” असा दावा खरगे यांनी केला. काँग्रेस अध्यक्षांनी असाही दावा केला की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी खोट्या गोष्टींना सत्यात रूपांतरित करण्यात पटाईत आहेत”. ते म्हणाले की, “पटेल यांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी संघावर बंदी घातली”. खरगे म्हणाले, “जर तुम्ही (भाजप) प्रत्येक गोष्टीसाठी काँग्रेसला दोष देत असाल तर तुमच्या स्वतःच्या कृतींकडे पहा.” खरगे म्हणाले, “तुम्ही सत्य कितीही पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसले जाणार नाही.” नेहरू आणि पटेल यांचे चांगले संबंध होते Mallikarjun Kharge on RSS। पुढे बोलताना ते म्हणाले, “ते (पंतप्रधान आणि भाजप) नेहमीच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात दरी दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर नेहरू आणि पटेल यांचे खूप चांगले संबंध होते आणि पटेल यांनी नेहरूंना लोकनेते म्हणून वर्णन केले होते.” ते म्हणाले, “मी भाजपला सांगू इच्छितो की दहीहंडीत खडे शोधू नका. सर्वांना तुमचा इतिहास माहित आहे. गुजरातमध्ये पटेलांच्या पुतळ्याचे अनावरण करणारे आणि सरदार सरोवर धरणाची पायाभरणी करणारे नेहरू हे पहिले होते. पंतप्रधानांचा काँग्रेसवर निशाणा Mallikarjun Kharge on RSS। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी बोलताना, “सरदार पटेल इतर संस्थानांप्रमाणे संपूर्ण काश्मीर भारतात एकत्र करू इच्छित होते, परंतु तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी हे होण्यापासून रोखले” असे म्हणत त्यांच्यावर टीका केली. गुजरातमधील एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “सरदार पटेलांचा असा विश्वास होता की इतिहास लिहिण्यात वेळ वाया घालवू नये तर इतिहास घडवण्यासाठी कठोर परिश्रम करावेत.” मोदी म्हणाले, “सरदार पटेल इतर संस्थानांप्रमाणेच संपूर्ण काश्मीरचे एकत्रीकरण करू इच्छित होते. परंतु नेहरूजींनी त्यांची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. काश्मीरचे विभाजन झाले, वेगळे संविधान आणि वेगळे ध्वज देण्यात आले आणि काँग्रेसच्या या चुकीमुळे देशाला दशके त्रास सहन करावा लागला.”