Jaykumar Gore : माण-खटावमध्ये जयकुमार गोरेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकाच दिवशी डबल धक्का

प्रभात वृत्तसेवा
सातारा – माण खटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून भाजपमध्ये सुरु असलेले इनकमिंग आता आणखी वेगवान झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करत ऑपरेशन लोटसची तीव्रता चांगलीच वाढवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) खटाव तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शदर पवार) माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या हे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सिध्दनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली.जिल्हा परिषद आणि खटाव पंचायत समितीचे सभापतिपद भूषविलेल्या नंदकुमार मोरे यांच्यासह माजी उपसभापती बाळासाहेब माने हिवरवाडीकर, माजी उपसभापती हिराचंद पवार चितळीकर, शंकरराव मोरे (दातेवाडी), मुरली भुशारी, बबन कदम, सुरेश पाटील, जयवंत घाडगे, राकेश चवर, अतुल यलमर, महेंद्र देशमुख, बापूराव घाडगे आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षप्रवेश निमसोड, कातरखटाव गटासह खटाव तालुक्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणार आहे.माण तालुका राष्ट्रवादी (शरद पवार ) गटालाही ना. गोरे यांनी चांगलाच झटका दिला आहे. तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजपचे कमळ हाती घेत आहेत. त्यांच्याबरोबर कार्यकारी नगरसेवक सुरज गुंडगे, नगरसेवक महेश जाधव, राजेंद्र साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक राजेंद्र रामचंद्र साळुंखे, स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय अवघडे, नगरसेविका वर्षाराणी सावंत,माजी नगरसेवक लक्ष्मण खताळ, राजेंद्र महाडिक उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अरुण गोरे यांनी दिली.
भाजपमध्ये सहभागी व्हायला अनेक इच्छुक
“भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्वासाने ग्रामविकास विभागाचे महत्वाचे मंत्रिपद माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला दिले. मंत्रिपदाच्या माध्यमातून आपण मतदारसंघात न भूतो न भविष्यती विकासकामे करण्याला प्राधान्य देत आहोत. या विकास प्रवाहात विरोधातील अनेक जण सहभागी सहभागी झाले आहेत. आणखी अनेक जण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत.”
– ना. जयकुमार गोरे (मंत्री , ग्रामविकास आणि पंचायतराज विभाग)





