नवी दिल्ली : देशात आज अघोषित आणीबाणी सुरू आहे. या सरकारमध्ये बंधुता नसल्याने त्यांना इतरांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. तसेच मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी संविधान हत्या दिनाचे नाटक रंगविले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. नवी दिल्ली येथील काँग्रेसच्या इंदिरा भवन येथे आयोजीत पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजप-संघावर टीका केली. खर्गे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यात, संविधान तयार करण्यात यांनी कोणतीही भूमिका बजावली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारले तेच आज आवाज उठवत आहेत. तेच लोक आता संविधान वाचवण्याच्या गोष्टी बोलत आहेत. मोदी सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेले नाही. तसेच केंद्र सरकारच्या धोरणामुळे आज संविधान धोक्यात आले आहे. काँग्रेसच्या संविधान बचाओ यात्रेने भाजप अस्वस्थ आहे, म्हणूनच ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणीचा आजही ते आवाज उठवत आहे. हे सरकार अपयशी ठरले आहेत. सरकारकडे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक अपयशाचे कोणतेही उत्तर नाही. देशात आज मोठी आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. त्यामुळेच खोटेपणा आणि अपयश लपवण्यासाठी त्यांनी हे नाटक केले आहे, खर्गे म्हणाले.