माळेगाव साखर कारखाना निवडणूक: चंद्रराव-रंजन तावरेंच्या सहकार बचाव पॅनलची उमेदवार यादी जाहीर

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलनंतर ज्येष्ठ सहकार तज्ञ चंद्रराव तावरे आणि माजी चेअरमन रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. गेल्या पाच वर्षांत कारखान्याच्या चुकीच्या कारभारामुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी, उसाला अधिक दर, कारखान्याचे विस्तारीकरण आणि नवीन उद्योग उभारण्याच्या उद्देशाने हा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
रंजन तावरे यांनी सभासदांचा ‘अण्णा-काका’ या जोडीवर विश्वास असल्याने सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. सहकार बचाव पॅनल हा शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेला असून, उमेदवार कारखान्याचे मालक नव्हे, तर सेवक म्हणून काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्या (१३ जून) सकाळी ९ वाजता निरावाघज येथे प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
सहकार बचाव पॅनलचे उमेदवार:
माळेगाव (गट क्रमांक १): रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, रमेश शंकरराव गोफणे
पणदरे (गट क्रमांक २): सत्यजित संभाजी जगताप, रणजीत शिवाजीराव जगताप, रोहन रवींद्र कोकरे
सांगवी (गट क्रमांक ३): चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजीत वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे
खंडज-शिरवली (गट क्रमांक ४): मेघशाम विलास पोंदकुले, विलास नारायण सस्ते
निरावाघज (गट क्रमांक ५): राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासो देवकाते
बारामती (गट क्रमांक ६): गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह विजयसिंह गवारे
ब वर्ग (सहकारी उत्पादक/बिगर उत्पादक/पणन संस्था): भालचंद्र बापूराव देवकाते
महिला प्रतिनिधी: राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे
अनुसूचित जाती-जमाती: बापूराव आप्पा गायकवाड
इतर मागास प्रवर्ग: रामचंद्र कोंडीबा नाळे
भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास: सूर्याजी तात्यासो देवकाते
निवडणूक प्रक्रिया: निवडणुकीचे मतदान २२ जून रोजी होणार असून, २४ जून रोजी मतमोजणी होईल. निळकंठेश्वर, बळीराजा आणि सहकार बचाव पॅनल यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सहकार बचाव पॅनलने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





