मला रात्री फोन आलेला दादा तिथे….; PDCC बँक रात्री उघडी होती का? प्रश्नावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज २२ जून २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने तीन पॅनेलमध्ये लढत होणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचा सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे.
चेअरमन पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असलेले अजित पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांनी बारामतीमधील प्रशासकीय इमारतीत आपल्या सवयीप्रमाणे सकाळीच मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना बारामतीमधील आमराई भागात असणारी पीडीसीसी बँकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अजित पवार काय म्हणाले?
ज्या दिवशी आचारसंहिता सुरू झाली त्या दिवसापासून शरद संकुल याठिकाणी त्यांचा अड्डा तिथेच आहे. सहकाराच्या नियमात आचारसंहितेच्या काळात कोणालाही त्या ठिकाणी बसता येत नाही. तिथे बसून त्यांच्या प्रचार करता येत नाही. याद्या करता येत नाहीत. काल रात्री सुद्धा तिथे बसूनच राजकारण चाललं होतं. मला रात्री फोन आलेला दादा तिथे स्कॉड पाठवा बघा काय होते ते काय करायचं, पण ज्याचं त्याला लखलाभ, असे म्हणत पीडीसी बँकेत निळकंठेश्वर पॅनलचा एक तरी सदस्य होता का? असा प्रतिसवाल अजित पवारांनी विरोधकांना केला आहे.
आरोप काय?
गेल्या काही दिवसांपूर्वी बारामतीमधील आमराई भागात असलेली पीडीसीसी बँक रात्री अकरा वाजेपर्यंत उघडी होती, असा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनेलचे रंजन तावरे यांनी केला होता. तसेच मंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकारी आणि दादांचे पीए सुनील मुसळे उपस्थित असल्याचाही आरोप करण्यात आला होता. यामुळे बारामतीतील वातावरण चांगलेच तापले होते. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बँक चौकशीच्या मागणी केली होती. तर युगेंद्र पवार यांनी दिली या प्रकरावर प्रतिक्रिया देत बँकेचा लोड वाढला असल्याचे खोचक विधान केले होते.
हेही वाचा : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”या हल्ल्याने…”





