Malegaon Election Results : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरूवात झाली. मध्यरात्री दीड वाजता पहिल्या फेरीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज सकाळपासून दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता लवकरच संपूर्ण निकाल हाती येणार असून, मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. यामुळे अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे अजित पवारांच्या समर्थनक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जंगी सेलिब्रेशन केली आहे. ‘अरे सांगवीला सांगा, माळेगावला सांगा, चेअरमन आमचा अजितदादा…. अरे एकच वादा, अजितदादा… आला रे आला दादाच आला’, अशा घोषणांनी माळेगाव कारखान्याचा परिसर दणाणून गेला आहे. ‘ब’ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले असून आतापर्यंतचे कल पाहता अजित पवार यांच्या नीलंकठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना यश मिळताना दिसत आहे. यामुळे अजित पवार माळेगाव कारखानाच्या निवडणुकीत २१ पैकी किती जागा जिंकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मोठ्या प्रमाणावर क्रॅास व्होटिंग काल मंगळवारी माळेगाव सहकारी साखर कारखानाच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्राॅस व्होटिंग झाल्याची बाब समोर आली होती. २२ जून २०२५ रोजी माळेगाव साखर कारखान्याची निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत अजित पवारांचे नीलकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळिराजा सहकार बचाव पॅनेल, चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव आणि शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, अशी चार पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात होती. विविध नाट्यमय घडामोडींनी चर्चेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. उमेदवारांसाठी ते स्वतः प्रचार सभा घेत होते. राज्याचे अजित पवार हे उपमुख्यमंत्री असल्याने अर्थखाते त्यांच्याकडे आहे, म्हणजेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हाती आहेत. अजित पवार यांनी कारखान्याला ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ही निवडणूक विविध नाट्यमय घडामोडींनी देखील चर्चेत राहिली होती. हेही वाचा : अमरावती जिल्हा बँक प्रकरण : बच्चू कडू यांना मोठा दिलासा; म्हणाले, “सत्याचा विजय”