Malegaon Sugar Factory – माळेगाव कारखान्याने २०२५.२०२६ या हंगामात १२ लाख टनांवर ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले होते. परंतु जादा पावसामुळे प्रती एकरी उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या हंगामकरीता एफआरपीनुसार ३२७० रुपये प्रति टनाप्रमाणे येत असून कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्त म्हणजे रुपये ३३०० रुपये टन प्रमाणे सर्व पेमेंट ऊस पुरवठाधारकांना अदा केले आहे. (दि.५) फेब्रुवारीनंतर गाळपास आलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेन उसास १०० रुपये अधिकचे (रुपये ३४००) पेमेंट अदा केले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कारखान्याचे दिवंगत चेअरमन अजित पवार यांनी कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यभार स्वीकारला होता. अजित पवार यांच्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार कारखान्याचा गळीत हंगाम यशस्विरीत्या सुरु झाला होता. मात्र, अजितदादा यांच्या निधनानंतर कारखान्याने गाळप हंगाम यशस्वी केला आहे. कारखान्याने सभासदांचे ७, २०, १८९. ८८७ टन कार्यक्षेत्रातील बिगर सभासदांचे १३, ९९४. ७०० टन व गेटकेन ऊस पुरवठादारकांचे ३,५५,४९९.२६७ टन अशा गळीत हंगाम २०२५.२६ करीता गाळपास आलेल्या ऊसाचे एफआरपीपेक्षा जास्त पेमेंट ऊस पुरवठादारांना वर्ग केले. दिवंगत अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हंगाम यशस्वी. कारखान्याच्या विद्यमान चेअरमन तथा उपमुख्यमंत्री,सुनेत्रा पवार, व्हाईस चेअरमन संगीता कोकरे व संचालक मंडळ आदींच्या मार्गदर्शनाखाली तसेच सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार, तोडणी मजुरांच्या सहकार्याने कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीतपणे पार पडला असल्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी सांगितले. १२५ दिवसांत हंगाम पूर्ण माळेगाव कारखान्याने (दि.६) मार्चअखेर १०, ८९, ६८३. ८५४ टन ऊस गाळपाचा टप्पा १२५ दिवस या अल्पावधीमध्ये पूर्ण केला असून बी हेवी डायव्हर्जन सह सरासरी १२.२८३ या रिकव्हरीने १२, ७७, १०० क्विंटल इतक्या साखरेचे उत्पादन घेतले आहे. या हंगामामध्ये कारखान्याने ८,८९,७७,३०० युनिटची वीज निर्मिती केलेली आहे. यापैकी अंतर्गत वापर ३, ६७, ७८, ७४० युनिट होऊन ५, २१, ९८, ५६० युनिट इतकी वीज महावितरण कंपनीला निर्यात केलेली आहे. कारखान्याचे डिस्टीलरी विभागामध्ये हंगामात स्पिरीट (बी हेव्ही व सी हेव्ही) ९३,८१,४१६ लिटर्स व इथेनॉल (बी हेव्ही व सी हेव्ही) ७६,२३,७८० लिटर्स उत्पादन घेतलेले आहे.