Baramati : सहानुभूती, संघटनशक्तीचा कौल
Baramati : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारातील सत्ताबदलाचा प्रसंग नाही; तर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची झालेली पहिली मोठी सहकार क्षेत्रातील कसोटी होती.

बारामती : संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक दर देऊन चर्चेत आलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. कारखान्याचे आधारस्तंभ, कणखर नेतृत्व असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी पहिली निवडणूक, अजितदादांच्याविषयी सहानुभूती, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे शेवटच्या क्षणी बंड, युगेंद्र पवार यांची तिसरी आघाडी, आदी घडामोडींतून शिवारातील लढत रंगतदार झाली. या तिरंगी लढतीत ऊस उत्पादक सभासदांचा विजयी कौल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भविष्यात व्यापक बनविण्यासाठी निणार्यक ठरला.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखान्याची निवडणूक केवळ सहकारातील सत्ताबदलाचा प्रसंग नाही; तर अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची झालेली पहिली मोठी सहकार क्षेत्रातील कसोटी होती. अजितदादांच्या अकाली निधनानंतर राजकीय पोकळी, सुनेत्रा पवार यांच्यावर आलेली नेतृत्वाची जबाबदारी, पक्षातील अंतर्गत आव्हाने होती. सोमेश्वरच्या सत्तेसाठी उभे ठाकलेले तीन पॅनल, असे चित्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी निर्माण झाले.
एकाच वेळी दोन पॅनल आखाड्यात उतरल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी पहिलीच अग्निपरीक्षा होती. ऐन निवडणुकीत विश्वासू शिलेदार असलेले अध्यक्ष जगताप यांनी वेगळी चूल मांडली. अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीला नाट्यमय कलाटणी मिळाली. जगताप यांनी भाजपशी घरोबा करीत स्वतंत्र पॅनल तयार केले. त्यात आजी- माजी संचालकांना समावेश होता. ज्यांना पद देऊन मोठे केले. त्यांनीच लढाईत फंदफितुरी केल्याची भावना ऊस उत्पादक सभासदांमध्ये निर्माण झाली.
तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने ही लढाई गाफील राहण्यासारखी नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने रणनिती, डावपेच आखले. एकीकडे जगताप यांनी भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांना सोबत घेतले. सर्वाधिक दर दिल्याने सभासद आपल्याच बाजूंनी कौल देतील, असा विश्वास पुरूषोत्तम जगताप यांना होता. पै- पाहुणे, तेरा वर्षांतील सत्ताकाळीतील जवळीकता, आदी बलस्थाने सोबत घेत सत्ताधारी गटाविरोधात लढा सुरू ठेवला.
शरद पवार गटाच्या पॅनलकडून युगेंद्र पवार यांनी पुरूषोत्तम जगताप यांना टार्गेट केले. त्याचबरोबर बंडखोरे नेते जगताप यांच्या पॅनलवरून जय पवार यांनी भरसभेत धारेवर धरले. त्यातून सुनेत्रा पवार यांच्याविषयी सभासदांमध्ये एक सहानुभूतीचा संदेश परावर्तित झाला. त्याचे पदसाद मतपेटीतून उमटले. या विजयामागे केवळ सहानुभूतीची लाट, संघटनात्मक ताकद, स्थानिक समीकरणे, सुनेत्रा पवार यांची प्रचारातील संयत भूमिका, या जमेच्या बाजू ठरल्या.
जगताप यांच्या भूमिकेला नाकारले
सोमेश्वरच्या निवडणुकीतील सर्वांत महत्त्वाचा पेच म्हणजे तेरा वर्षे कारखान्याचे नेतृत्व करणारे पुरुषोत्तम जगताप यांचे स्वतंत्र पॅनल उभे करणे. जगताप यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने विविध उपक्रम राबवले. कारभाराच्या आधारे सभासदांसमोर बाजू मांडली. त्यांच्या प्रचाराचा भर प्रगती, व्यवस्थापन, कामाचा होता. दीर्घकाळ कारभार पाहिलेल्या नेतृत्वाला पुन्हा संधी मिळावी, हा त्यांच्या भूमिकेचा गाभा होता. मात्र, सूज्ञ मतदारांनी जगताप यांना नाकारले. अजित पवार गटाने जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचा मुद्दा पुढे आणत, अजितदादा असते तर या राजकीय घडामोडीकडे कसे पाहिले असते, असा भावनिक प्रश्न सभासदांसमोर मांडला. इथेच स्वरूप बदलले. एका बाजूला कारखान्याच्या कामगिरीचा लेखाजोखा, तर दुसऱ्या बाजूला राजकीय निष्ठा, नेतृत्वाशी दगाफटका, यावर लढत केंद्रीत झाली.
युगेंद्र पवारांचा पर्याय किती प्रभावी?
राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनल केले. युगेंद्र पवार यांच्या पॅनलने निवडणुकीत स्वतंत्र आव्हान उभे केले. त्यामुळे लढत केवळ सत्ताधारी गट विरुद्ध बंडखोर, इतकी सरळ राहिली नाही. राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील राजकीय अंतर, स्थानिक नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा, सभासदांसमोर पर्याय आदींचा कस लागला. ही निवडणूक युगेंद्र पवार यांच्यासाठी मशागतीसाठी उपयुक्त ठरली.
सहानुभूतीची लाट प्रभावी ठरली
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये सहानुभूतीची भावना निर्माण झाली, हे नाकारता येणार नाही. मात्र, सोमेश्वरच्या निकालाचे संपूर्ण श्रेय केवळ सहानुभूतीला देणेही तितकेच अपुरे ठरेल. निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी सभासदांशी साधलेला थेट संवाद, पक्षाच्या कार्यकर्त्यांची यंत्रणा, गावपातळीवरील संपर्क, नेतृत्वाबाबत निर्माण झालेला विश्वास या घटकांचाही विचार करावा लागेल. प्रचारात आर्थिक ताकदीचा वापर झाल्याचे आरोप किंवा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा स्वरूपाच्या राजकीय मांडण्या पुढे येऊ शकतात. मात्र, ठोस पुराव्यांशिवाय अशा आरोपांना निकालाचे निर्णायक कारण मानणे योग्य ठरणार नाही.





