Malegaon Bomb Blast : साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितसह निर्दोष सुटलेले सात आरोपी कोण? जाणून घ्या त्यांच्यावरील आरोप

Malegaon blast case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने गुरुवार 31 जुलै रोजी ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना “पुराव्यांअभावी” दोषमुक्त करण्यात आले. या प्रकरणातील सातही आरोपी कोण होते आणि त्यांच्यावरील आरोप काय होते? चला जाणून घेऊया…
1. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भोपाळच्या माजी भाजप खासदार आणि हिंदू धार्मिक नेत्याच्या भूमिकेत सक्रिय आहेत.या प्रकरणात स्फोटात वापरलेली LML फ्रीडम मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती, आणि त्या स्फोटाच्या मुख्य सूत्रधार असल्याचा ATS चा दावा होता. त्यांनी ‘अभिनव भारत’ या हिंदू कट्टरपंथी संघटनेमार्फत कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
न्यायालयाने साध्वी यांचा मोटारसायकलशी थेट संबंध सिद्ध न झाल्याचे आणि पुराव्याअभावी त्यांना निर्दोष जाहीर केले. साध्वी यांना 2017 मध्ये जामीन मिळाला होता. याबाबत बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, मला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले, आज खरा न्याय मिळाला,असे साध्वी यांनी निकालानंतर सांगितले.
2. प्रसाद श्रीकांत पुरोहित
प्रसाद श्रीकांत पुरोहित हे भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना अटक झाली होती. त्यांच्यावर स्फोटासाठी RDX पुरवल्याचा आणि स्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होता. तसेच ते ‘अभिनव भारत’शी संबंधित असल्याचा दावा आहे.
RDX पुरवल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे आणि तपासात त्रुटी असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये त्यांना “राजकीय कुरघोडी”चा बळी ठरल्याचे नमूद करत त्यांना जामीन दिला होता. 17 वर्षांच्या लढाईनंतर सत्याचा विजय झाला, असं पुरोहित यांनी सांगितले.
3. निवृत्त मेजर रमेश उपाध्याय
रमेश उपाध्याय हे निवृत्त लष्करी अधिकारी आणि ‘अभिनव भारत’ संघटनेचे सदस्य आहेत. स्फोटाच्या कटात सक्रिय सहभाग आणि बैठका आयोजित करण्यात भूमिका असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. कट रचल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
4. अजय राहिरकर
अजय राहिरकर हे ‘अभिनव भारत’ संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत. स्फोटाच्या कटासाठी आर्थिक व्यवस्था आणि निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आर्थिक व्यवस्थेचा पुरावा नसल्याने आणि तपासातील त्रुटींमुळे त्यांना निर्दोष जाहीर केले.
5. सुधाकर द्विवेदी (उर्फ स्वामी अमृतानंद देवतीर्थ)
सुधाकर द्विवेदी हे धार्मिक व्यक्तिमत्व, दयानंद पांडे नावानेही ओळखले जाते. धार्मिक विचारधारेच्या माध्यमातून लोकांना भडकवणे आणि स्फोटाच्या कटाला मानसिक पाठिंबा देणे असे आरोप त्यांच्यावर होते. पुराव्याअभावी आणि साक्षीदारांच्या फितुरीमुळे त्यांना निर्दोष मुक्त केले.
6. सुधाकर चतुर्वेदी
सुधाकर चतुर्वेदी हे ‘अभिनव भारत’शी संबंधित कार्यकर्ता आहे. स्फोटाचा कट रचण्याच्या बैठकीत सहभाग आणि घरी बॉम्ब बनवल्याचा आरोप त्यांच्यावर होता. बॉम्ब बनवल्याचा कोणताही पुरावा नसल्याने आणि तपासातील त्रुटींमुळे त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.
7. समीर कुलकर्णी
समीर कुलकर्णी हे ‘अभिनव भारत’शी संबंधित कार्यकर्ता आहे. स्फोटासाठी लागणारी स्फोटके आणि रसायने पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पुराव्याअभावी आणि साक्षीदारांच्या फितुरीमुळे त्यांना निर्दोष जाहीर केले. निकालानंतर समीर कुलकर्णी यांना न्यायालयात अश्रू अनावर झाले.
मालेगाव बॉम्बस्फोट संपूर्ण घटनाक्रम ?
- 29 सप्टेंबर 2008 : मालेगावच्या भिक्खू चौकात स्फोट, 6 ठार, 101 जखमी.
- ऑक्टोबर-नोव्हेंबर 2008 : साध्वी प्रज्ञा (23 ऑक्टोबर) यांच्यासह 11 जणांना अटक.
- 2011 : तपास NIA कडे हस्तांतरित.
- 2016 : NIA ने साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध पुरावे अपुरे असल्याचा अहवाल, परंतु विशेष न्यायालयाने खटला चालवण्याचे आदेश दिले.
- 2018 : सात आरोपींवरील खटल्याला सुरुवात.
- 19 एप्रिल 2025 : सुनावणी पूर्ण, निकाल राखीव.
- 31 जुलै 2025 : सर्व सात आरोपी निर्दोष.





