छत्रपती संभाजीनगर : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची समाजाची जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी आता माजी आमदार आसिफ शेख यांच्या पाठोपाठ एमआयएमचे माजी आमदार इम्तियाज जलील यांनीही उडी घेतली आहे. आता इम्तियाज जलील यांनीही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींना एनआयए कोर्टाने निर्दोष सोडले. या निकालावर मालेगाव शहरवासीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यातूनच आता नव्याने राजकारण तापले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व आरोपींचा घटनेशी संबंध जोडण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेला यश आले नाही, असा निष्कर्ष विशेष एनआयए न्यायालयाने दिला होता. स्फोटासाठी वापरण्यात आलेले बॉम्ब आणि अन्य गुन्हेगारी कट याबाबत संबंधित आरोपींचा संबंध जोडण्यात न्यायवैद्यक प्रणालीत पुरेसे पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. या निष्कर्षामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरले. या खटल्यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे आरोपी होते. त्यांचा संबंध थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडण्याचा प्रयत्न झाला होता. यातूनच भगवा आतंकवाद हा राजकीय शब्द पुढे आला. इम्तियाज जलील यांनी आता या प्रकरणात उडी घेत या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती दिली. त्यांनी मालेगावच्या बॉम्बस्फोटातील पीडितांच्या गाठीभेटी घेतल्या. विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणात मालेगावकरांमध्ये अन्यायाची भावना असल्याचे सांगितले.