मुंबई : नथुराम गोडसेने गोळी मारताना धर्म बदलला होता का? दहशतवादी हा गुन्हेगार आहे, मारेकरी आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. पहलगाम हल्ला झाल्यानंतर आरोपी सापडले नाहीत, ट्रेन ब्लास्टमध्ये पुरावे सापडले नाहीत म्हणून मुक्त केले. मालेगावमध्येही तेच झाले. गृहमंत्र्यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. आज एका मागोमाग एक आरोपी सुटत असतील, तर गृहमंत्र्यांच्या यंत्रणाचे अपयश आहे. एनआयए अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. मुंबई बॉम्बस्फोटातही कोणीच दोषी नाही. जी माणसे मेली आणि जखमी झाली त्यांना काय सांगणार ? अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो पर्यंत या यंत्रणा काम करतील तोपर्यंत असे निकाल अपेक्षित आहे, अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मालेगाव निकालावर बोलताना चव्हाण म्हणाले की, घटना 2008 ची आहे आणि आता अनेक वर्ष झाली खटला चालला. त्या घटनेत कोणीतरी स्फोट केला.स्फोट आपोआप झाला नसून एका मशीदीच्या शेजारी हा स्फोट झाला. निकाल कसा लागणार आहे या सगळ्या प्रकरणाचा याची खात्री होती. ज्या दिशेने तपास चालला त्यामध्ये काही होईल असेही वाटले नाही. न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले की, एनआयएने पुरावेच दिले नाहीत, त्यामुळे आरोपींची मुक्तता केली. जर यांनी बॉम्ब फोडला नाही, तर कोणी फोडला? हा कट कोणी केला हे सांगत नसल्याचे देखील ते म्हणाले. भाजपने जाती धर्मात गुंतवून ठेवले… भाजपने एका जाती-धर्मात गुंतवून ठेवले आहे. ते आज उत्सवासारखा दिवस साजरा करत आहेत, पण जे मृत्युमुखी पडले त्यांना काय सांगणार? हे एनआएचे हे अपयश आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली हे काम करतात. आरोपींना शिक्षा झाली नाही कारण एनआयए पुरावे सादर करु शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या माफीचा काय प्रश्न आहे, मुख्यमंत्री काहीही म्हणतील, असे म्हणताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देखील लक्ष्य केले.