प्रभात वृत्तसेवा पुणे – रेल्वे प्रवासामध्ये हृदयविकाराचा झटका येणे, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा प्लॅटफाॅर्मवर चालत्या ट्रेनमधून पडून अपघातात मृत्यू पडल्याच्या घटना पुणे रेल्वे विभागात घडल्याचे दिसून येते. त्यामध्ये मागील नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर २०२५) पुणे रेल्वे विभागात अशा घटनांमध्ये ३०१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे फ्लॅटफार्मवर चालत्या ट्रेनमध्ये बसताना किंवा उतरताना पडलेल्या प्रवाशांना वेळीच बाहेर काढून त्यांचा प्राण वाचविण्यातही आरपीएफच्या जवानांना यश आले. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागात १०७ स्थानके आहेत. त्याअंतर्गत पुणे विभागाकडून विविध स्तरावर कामे चालतात. त्यानुसार रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलाकडे (आरपीएफ) प्रवाशांची, रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या मालमत्तांच्या सुरक्षांची मोठी जबाबदारी असते. यासोबतच प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वस्तूंसह प्रवाशांची सुरक्षितता, ही मोठी जबाबदारी रेल्वे सुरक्षा बल पार पाडत असते. मात्र, अवघ्या नऊ महिन्यांत ३०१ जणांचा रेल्वे दुर्घटनांमध्ये मृत्यू होणे, ही बाब चिंताजनक असून, त्यावर तत्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील १०७ रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांतील मृत्यूंची ही स्थिती आहे, असे रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी रेल्वे सुरक्षा बलाकडून ही नोंद नोंदवली गेली आहे. अशा घटनांचे प्रमाण अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रशासन पातळीवर विविध ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातील उपाययोजना केल्या जात असल्याचेही बेहरा यांनी सांगितले. दरम्यान, प्लॅटफॉर्मवरून गाडीमध्ये चढताना किंवा उतरताना रेल्वेखाली जाणाऱ्या अनेक प्रवाशांना वाचवल्याच्या घटनादेखील पुणे विभागात समोर आल्या आहेत. पुणे विभागातील या घटनांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. “मागील नऊ महिन्यांत ३०१ जणांचे रेल्वे दुर्घटनांमध्ये मृत्यू झाल्याची नोंद पुणे विभागात करण्यात आली आहे. हे थांबवण्यासाठी विविध पातळीवर आम्ही प्रयत्न करीत आहे. यासोबतच प्रवाशांनी स्वत:ची काळजी घ्यावी, याकरिता जनजागृतीदेखील करीत आहे.” – हेमंत कुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग