Malad Delivery Boy : मालाड हादरलं! डिलिव्हरी बॉयचं काळं कृत्य; सीसीटीव्हीमुळे धक्कादायक प्रकार उघड
Malad Delivery Boy : घराबाहेर न पडता वस्तू दारात मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात असली, तरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Malad Delivery Boy POCSO Arrest : मुंबईत ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढले असतानाच, एका डिलिव्हरी बॉयने केलेल्या किळसवाण्या कृत्याने मालाड परिसर हादरला आहे. साडीची डिलिव्हरी देण्याच्या बहाण्याने एका २४ वर्षीय तरुणाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
घराबाहेर न पडता वस्तू दारात मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात असली, तरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालाडमध्ये साडीची डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने घरात एकट्या असलेल्या १२ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सुट्ट्या पैशांचे निमित्त आणि अश्लील कृत्य –
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील एका महिलेने ऑनलाइन साडी मागवली होती. डिलिव्हरी बॉय जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा घरात १२ वर्षांची मुलगी एकटीच होती. “माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, कोणाला तरी खाली पाठवा मी पैसे देतो,” असे खोटे कारण सांगून त्याने पीडित मुलीला इमारतीखाली बोलावले. खाली गेल्यावर पेमेंटचे डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ लावून त्या मुलीला दाखवण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तेथून पळ काढला.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला ठोकल्या बेड्या –
मुलगी ओरडल्यानंतर कुटुंबीयांना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी तत्काळ मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्र फिरवले. त्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी मोहम्मद उपेश अनवर अन्सारी (२४) याला मालवणी परिसरातून अटक केली. आरोपीवर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने अशा प्रकारे इतर कोणाला लक्ष्य केले आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





