Mumbai News : मुंबईतील मालाड पूर्व परिसरात गुरुवारी रात्री एका आठ वर्षांच्या चिमुकल्याचा बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. दिव्यांश राजेश मौर्य असे या मृत बालकाचे नाव असून, खेळता खेळता आपला चेंडू काढण्याच्या नादात तो या मृत्यूच्या सापळ्यात अडकला. गुरुवारी रात्री दिव्यांश नेहमीप्रमाणे आपल्या घराबाहेर खेळत होता. खेळत असताना त्याचा चेंडू बांधकामासाठी खोदलेल्या एका खोल खड्ड्यात पडला. मागील काही दिवसांतील पावसामुळे हा खड्डा पाण्याने पूर्णपणे भरलेला होता. आपला चेंडू परत मिळवण्याच्या प्रयत्नात असताना दिव्यांशचा पाय घसरला आणि तो थेट पाण्यात कोसळला. खोल पाणी आणि चिखलामुळे त्याला बाहेर पडता आले नाही आणि तो तिथेच बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने दिव्यांशला पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी कांदिवली येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी कुरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.