पुणे जिल्हा | भोर विधानसभा मतदार संघातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा

भोर, (प्रतिनिधी) – भोर विधानसभा मतदार संघात अतिवृष्ठीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी भोर, वेल्हा-मुळशी मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी जिल्हाधिकारी डाॅ. सुहास दिवसे यांना निवेदन देऊन मागणी केली.
भोर, राजगड व मुळशी तीन्हीही तालुके अति पावसाळी व डोंगरी भागात विखुरलेले आहेत. मागील तीन दिवसापासून मतदारसंघातील भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील सरासरी ६५ मि.मि.पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने अनेक ठिकाणी शेतक-यांच्या भात शेतीच्या ताली व राहत्या घरांची पडझड झाली.
मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या तालींचे व घरांच्या पडझडीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे रितसर संयुक्तिक पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना केली आहे.





