भोर विधानसभा मतदारसंघ: इंगवली, आळंदे परिसरातील नागरिकांशी संग्राम थोपटेंनी साधला संवाद

भोर – भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील इंगवली, आळंदे, कासुर्डी, तेलवडी, मोहरी, हातवे, तांभाड, दीडघर, पारवडी, सोनवडी, गोऱ्हेपडळ, सांगवी, कुरुंगवडी, कोळवडी, जांभळी आदी गावातील मतदार बंधू-भगिनींच्या सोबत गाव भेट दौऱ्यात भेट घेऊन सवांद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले आजचा दौरा चित्रपटसृष्टीतील सिने अभिनेते दादा कोंडके यांच्या इंगवली गावातून सुरू केला. या भागात वीर धरण प्रकल्पांतर्गत समाजमंदिर, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, २५१५, ३०५४, ५०५४ अंतर्गत निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली, जलसंधारण विभागाच्या माध्यमातून हरिश्चंद्री ते तेलवडी हा बंधारा मंजूर करण्यात आला आहे, यामुळे या भागातील शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल व या बंधाऱ्यावरून चार चाकी वाहने जाण्यासाठीचा रस्ता देखील करण्यात येणार आहे, तसेच जांभळी येथील बांधाऱ्याचे देखील काम सुरू आहे. पीएमआरडीएअंतर्गत त्याठिकाणी ४५ लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले.
कासुर्डी येथील वोम या कंपनीच्या व्यवस्थापना संदर्भात काही अडचणी असल्यामुळे ते काम थांबले असून या ठिकाणी साधारणता दोन हजार कामगारांना रोजगार उपलब्ध होणार असल्याकारणाने त्यासंदर्भात विशेष लक्ष घालून प्रयत्नशील असल्याचे आमदार थोपटे म्हणाले. त्याचप्रमाणे विशेष करून कासुर्डी-हातवे-तांभाड रस्त्याचे काम मार्गी लावता आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कासुर्डी गावचे उपसरपंच तुकाराम उरणकर यांच्यासह गणेश पांडुरंग मालुसरे, सोमनाथ दगडे, बळीराम मालुसरे, नामदेव देवकर यांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला. या सर्वांचे अभिनंदन त्यांनी केले. यावेळी मानसिंग बाबा धुमाळ, रवींद्र बांदल, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, विठ्ठल आवाळे, लहूनाना शेलार, मदन खुटवड, सोमनाथ वचकल, अरविंद सोंडकर, किशोर बांदल, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ महिला भगिनी, तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.





