पुणे जिल्हा | तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशीयात्रा

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – भोर विधानसभा मतदार संघातील नागरिकांसाठी आयोजित मोफत काशीयात्रा नुकतीच पार पडली. चौथ्या टप्यातील या यात्रेसाठी खडकी रेल्वे स्टेशनवरून प्रस्थान केले. जवळपास तीन हजार नागरिकांना घेऊन काशी तीर्थक्षेत्रावर भेट दिली.
येथे काशी विश्वनाथ तसेच कालभैरवाचे दर्शन घेऊन सामूहिक गंगा आरती केली. एकच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या सामूहिक गंगा आरतीने भक्तीमय वातावरण तयार झाले.
आयुष्यात एकदा तरी काशी यात्रा घडावी हे अनेक लोकांचं स्वप्न किरण दगडे पाटील यांच्यामार्फत सत्यात उतरले. यात्रेकरुंच्या वतीने दगडे यांचा सत्कार करण्यात आला.
आतापर्यंत सुमारे १२ हजार नागरिकांनी दर्शन घेतले. याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात ३ हजार नागरिकांना काशी विश्वनाथाचे दर्शन घडविण्यात येणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.
खडकी रेल्वे स्टेशनवर आयोजक किरण दगडेपाटील यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी माजी आमदार शरद ढमाले, आप्पासाहेब चोंधे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे,किरण दगडे पाटील युवा मंचचे कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





