Makarand Patil: “वारकऱ्यांच्या सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी नको!” मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचना
Makarand Patil: स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतला थेट अधिकाऱ्यांकडून आढावा.

Makarand Patil – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी लोणंद येथील पालखीतळ आणि पाडेगाव येथील नीरा स्नान घाटाची पाहणी रविवारी केली. पालखी सोहळ्यात कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेऊन, वारकर्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
लोणंद पालखीतळ, पाडेगाव येथील नीरा स्नान घाटाची स्वच्छता, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधांबाबत संबंधित विभागांकडून मंत्री पाटील यांनी माहिती घेतली. पालखीतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, पालखी सोहळा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यासाठी आनंद आणि उत्साहाचा सोहळा आहे. लाखो वारकरी व भाविकांसाठी नागरी सुविधा, आरोग्य सेवा, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले आहे.
निर्मल वारी अभियानांतर्गत 1,800 शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. यावर्षी पालखीचा लोणंद येथे एकच मुक्काम असल्याने, कोल्हापूर, कोकण आणि सातारा जिल्ह्यातून दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानेही नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वीजवाहिन्या भूमिगत; रिंगरोडबाबत अधिवेशनानंतर बैठक
लोणंदमधील मुख्य रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी 12 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे मुख्य रस्ता अधिक रुंद होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंगरोड करण्याबाबत अधिवेशनानंतर संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. रिंगरोडझाल्यानंतर लोणंदमधील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




