Makarand Patil : प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना पुनर्वसन लाभाचा मार्ग मोकळा; मंत्री मकरंद पाटील यांचा ऐतिहासिक निर्णय
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील (Makarand Patil) यांच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Makarand Patil : राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन (Makarand Patil) प्रक्रियेत दीर्घकाळ भेडसावत असलेल्या अन्यायकारक अडचणींना अखेर पूर्णविराम मिळणार असून मूळ जमीनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना स्वतंत्र हक्काने पुनर्वसन लाभ मिळण्यासाठी शासनाने स्पष्ट आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील (Makarand Patil) यांच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपर्यंतच्या पद्धतीनुसार, मूळ जमीनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर वारसांची नोंद ७/१२ उताऱ्यावर उशिरा झाल्यास संपूर्ण कुटुंबाला एकच युनिट मानले जात होते. परिणामी, पर्यायी जमीन, पुनर्वसन पॅकेज आणि इतर शासकीय लाभ केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहत होते.
यामुळे कुटुंबातील इतर वारस विशेषतः भाऊ- बहिणी हक्काच्या लाभांपासून वंचित राहत असल्याची तीव्र नाराजी होती. या अन्यायकारक स्थितीची दखल घेत मकरंद जाधव-पाटील यांनी धोरणात्मक बदल घडवून आणत पुनर्वसन प्रक्रियेला नवी दिशा दिली आहे. नवीन निर्णयानुसार पुनर्वसन लाभ निश्चित करताना बंदी दिनांक ऐवजी भूसंपादन निवाड्याचा दिनांक हा आधार मानण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. विशेष म्हणजे २० डिसेंबर २००४ पूर्वीच्या निवाड्यांमध्ये प्रत्येक मुलाला स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता देण्यात येणार असून मृत मुलांच्या वारसांना (नातवंडांना) एक युनिट म्हणून लाभ दिला जाईल. २० डिसेंबर २००४ नंतरच्या प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान हक्काने स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
यामुळे महिलांना प्रथमच स्पष्ट आणि कायदेशीर अधिकाराने पुनर्वसन लाभ मिळणार असून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तोही सुधारित धोरणे पुनर्वसन अधिनियम १९९९ अंतर्गत येणाऱ्या त्या सर्व प्रकरणांना लागू राहणार आहेत, जिथे भूसंपादनाची ६५ टक्के रक्कम अदा झाली असली तरी जमीन वाटप प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक वर्षे शासनाच्या दारात हेलपाटे मारणाऱ्या कुटुंबांना आता दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.






