Satara | मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे

खंडाळा, – विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारणार्या आ. मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळायलाच पाहिजे, अशी मागणी वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
मकरंदआबांची आमदारकीची प्रत्येक निवडणूक एक प्रकारे ऐतिहासिक होती. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढून, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मदन भोसले, शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवून मकरंदआबांनी बाजी मारली होती. त्यानंतर 2014 मध्ये देशात आणि राज्यात मोदी लाट असतानाही मकरंदआबांनी भाजपचे पुरुषोत्तम जाधव व काँग्रेसचे मदन भोसले यांचा पुन्हा पराभव केला होता. 2019 साली मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळच्या निवडणुकीत युतीधर्म पाळत पुरुषोत्तम जाधव यांनी मदन भोसलेंना पाठिंबा दिला. त्यामुळे अनेक वर्षांनी या मतदारसंघात तिरंगीऐवजी दुरंगी लढत झाली. त्या निवडणुकीतही मकरंद पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून आमदारकीची हॅट्ट्रिक केली होती.
यंदाच्या निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मतदारसंघातील सर्व मातबर नेते, अशी लढत झाली. वाईतील प्रचार सभेत शरद पवार यांनी सौ. अरुणादेवी पिसाळ यांचा हात उंचावून ‘गद्दारांना पाडा.. पाडा.. पाडा..’ असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अगदी पाच-दहा हजारांच्या फरकाने कोणताही उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतरही, आजपर्यंतच्या अत्यंत चुरशीची समजल्या जाणार्या या निवडणुकीत मकरंद पाटलांनी तब्बल 61 हजराहून अधिक मताधिक्य मिळवून, विरोधकांना जोरदार धक्का दिला. या विजयानंतर महायुतीच्या समर्थकांनी संपूर्ण मतदारसंघात जोरदार जल्लोष केला. या मतदारसंघाला दिवंगत मदन पिसाळ यांच्यानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे मकरंदआबांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मकरंदआबांसारख्या दूरदृष्टीच्या नेत्याला मंत्रिपद मिळणे गरजेचे आहे. त्यांना मंत्रिपद मिळावे, ही सर्व समर्थकांची इच्छा आहे.
– राजेंद्र तांबे,
माजी सभापती, खंडाळा पंचायत समिती.
मकरंदआबा यांच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणार्या, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीच्या सर्वसमावेशक नेतृत्वाला मंत्रिपद मिळाल्यास, येत्या काळात सातारा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचे रोल मॉडेल नक्कीच ठरेल.
– नितीन ओव्हाळ,
युवा उद्योजक.
मतदारसंघातील असे एकही गाव नाही, जिथे मकरंदआबांनी निधी दिला नाही. 24 तास जनतेसाठी देणारे, सर्वसामान्यांच्या सुखदु:खात मिसळणारे आबा हे खरे लोकप्रतिनिधी आहेत. मंत्रिपद मिळाल्यास मकरंदआबांकडून मतदारसंघात विकासाचा पाऊस पडेल, एवढे मात्र नक्की.
– हिरालाल घाडगे,
आदर्श सरपंच, घाडगेवाडी.



