Makrand Patil : वाई-खंडाळा-महाबळेश्वरसाठी ‘आरोग्यदायी’ बातमी! मकरंद पाटलांच्या पाठपुराव्याला मोठं यश; पाहा काय बदलणार?
Makrand Patil : महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात येणार अत्याधुनिक निदान केंद्र आणि तज्ज्ञ डॉक्टर; दुर्गम भागातील नागरिकांना गावातच मिळणार दर्जेदार उपचार.

Makrand Patil – वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार ना. मकरंद पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, त्यांच्या पुढाकारातून मुंबई येथील मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील अपुऱ्या सुविधा, रिक्त पदे आणि आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी ना. मकरंद पाटील यांनी अनेक दिवसांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचाच परिपाक म्हणून मंत्रालयात ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत ग्रामीण रुग्णालय महाबळेश्वरचे श्रेणीवर्धन करून तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचा विषय प्राधान्याने मांडण्यात आला. यामध्ये आधुनिक निदान केंद्र, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, अत्याधुनिक उपकरणे आणि आपत्कालीन सेवा सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय बोपर्डी व उडतारे (ता. वाई), भादे (ता. खंडाळा) आणि कुंभरोशी (ता. महाबळेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असलेली मनुष्यबळाची कमतरता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेत येणाऱ्या अडचणींचा मुद्दा ना. मकरंद पाटील यांनी ठामपणे मांडला. ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठीही मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
कार्यवाही गतीमान करण्याचे संकेत
बैठकीत वाई व खंडाळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांतर्गत रिक्त पदे तसेच वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत प्रलंबित पदभरती तातडीने पूर्ण करण्याची ही मागणी करण्यात आली. यावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही गतीमान करण्याचे संकेत दिले.
सातत्याने पाठपुरावा करणार
ना. मकरंद पाटील यांनी बैठकीत सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये. दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाला शहरांप्रमाणे दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाल्याच पाहिजेत. यासाठी शासन स्तरावर आवश्यक त्या सर्व बाबींसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. या बैठकीमुळे वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे असून, ना. मकरंद पाटील यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.





