Makarand Patil : धावडीत अभ्यासिका उभारण्यासाठी निधी देणार; मंत्री मकरंद पाटलांची मोठी घोषणा
Makarand Patil : धावडीच्या भीमसेवा मंडळाने उभारली पंचशील बौद्ध विहाराची देखणी वास्तू; सुसज्ज अभ्यासिकेसाठी निधी देण्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आश्वासन.

Makarand Patil – धावडी येथील भीमसेवा मंडळाने पंचशील बौद्ध विहाराची देखणी वास्तू उभारली आहे. नजिकच्या काळात येथे सुसज्ज अभ्यासिका उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार आहे. आजवरच्या राजकीय वाटचालीत बौद्ध वस्तीतील नागरिकांनी मनापासून साथ दिली असल्याने इथल्या विकासकामांना लागेल तेवढा विकासनिधी देणार असल्याची ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
धावडी, ता. वाई येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पंचशील बौद्ध विहाराचे उदघाटन ना. मकरंद आबा पाटील यांचे हस्ते पार पडले. यावेळी वाई पंचायत समितीच्या उपसभापती सौ. वर्षा जगताप, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, धावडीच्या सरपंच वनिता ननावरे, बाजार समितीचे माजी संचालक विजयकुमार मांढरे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गंगावणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरुणआप्पा मांढरे उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, संपूर्ण जगभरात बुद्धांच्या शांततेचा मार्ग अनुसरला जातो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांनी देशाला अमूल्य अशी राज्यघटना दिली. या महापुरुषांच्या विचारांना चालना देणारे आकर्षक बुद्ध विहार धावडी येथे उभारल्याने मनस्वी आनंद झाला आहे. विधायक कामासाठी निधी देण्यासाठी आपण कायम तत्पर असल्याचे ना. पाटील यांनी यावेळी सांगितले. सतीश कुलकर्णी म्हणाले, छोट्याशा गावात बौद्ध विहारची सुंदर वास्तू कार्यकर्त्यांनी उभारली आहे.
बाबासाहेबांचा विचार सर्वत्र पोहोचवणे हेच काम गेली अनेक वर्षे करत आहे . बौद्ध विहाराच्या कामाला मदत केल्याबद्दल त्यांनी ना. मकरंद पाटील यांना धन्यवाद. याप्रसंगी विहाराच्या बांधकामासाठी धम्मदान देणाऱ्या माहेरवाशीण महिलांना मंत्रीमहोदयांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तानाजी खंडागळे यांनी प्रास्ताविक केले.
रमेश खंडागळे, शरद गंगावणे, दिलीप खंडागळे, स्वप्नील खंडागळे, हिरालाल गंगावणे, मिलिंद खंडागळे, तेजस्विनी खंडागळे, वंदना गंगावणे यांनी स्वागत केले. अशोक येवले यांनी सूत्रसंचालन तर रूपेश खंडागळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास धावडी, पिराचीवाडी, गुंडेवाडी ग्रामस्थांसह भीमसेवा मंडळाचे कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.



