Alephata : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
Alephata : संबंधित ट्रक देशी-विदेशी मद्याची वाहतूक करत पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना आळेखिंड परिसरात त्याच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागला.

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील आळेखिंड परिसरात शनिवारी सकाळी देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणार्या मालवाहू ट्रकला अचानक भीषण आग लागली. या आगीत ट्रकची पुढील केबिन जळून खाक झाली. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून सुरक्षितपणे बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
संबंधित ट्रक देशी-विदेशी मद्याची वाहतूक करत पुणे-नाशिक महामार्गावरून जात असताना आळेखिंड परिसरात त्याच्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणांत धुराचे प्रमाण वाढल्याने चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्याने तातडीने ट्रक महामार्गाच्या कडेला उभा केला आणि सुरक्षितपणे बाहेर पडला. दरम्यान, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी ट्रकच्या पुढील केबिनला वेढा घातला. आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
प्राथमिक अंदाजानुसार, ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रकमध्ये देशी-विदेशी मद्याचा साठा असल्याने घटनेचे गांभीर्य वाढले होते. सुदैवाने चालकाने वेळीच ट्रक थांबवून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. चालकाच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली असली, तरी या घटनेमुळे महामार्गावरील वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





