Nilesh Chavan arrested : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माग काढत नेपाळच्या सीमेवरून निलेश चव्हाणच्या ३० मे रोजी मुसक्या आवळल्या. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि अँटी गुंडा स्कॉडने त्याला बेड्या ठोकल्या. गेल्या दहा दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांनी गुंगारा देत होता. त्याने या दहा दिवसांमध्ये त्याने पुणे ते नेपाळ असा प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर मध्यरात्री त्याला अडीच वाजचा पुणे विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ही चाचणी पूर्ण झाल्यावर त्याला बावधन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज सकाळी दहा वाजता त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. गेल्या दहा दिवसांत त्याने पुणे ते नेपाळ कसा प्रवास केला याबाबतची माहिती आता समोर आली आहे. नेपाळ सीमेवरून घेतले ताब्यात गेल्या दहा दिवसांत निलेश चव्हाण याने पुण्यापासून नेपाळपर्यंत प्रवास केला. या प्रवासासाठी त्याने खाजगी वाहनांचा वापर केला. दोन- तीन मोबाईल फोन आणि पाच-सहा सिम कार्ड्स त्याने बाळगले होते. पुण्यातून नेपाळपर्यंत पोहचण्यासाठी त्याने नवी मुंबई, मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, गोरखपूर, सोनोली उत्तर प्रदेश भैरवा नेपाळ आणि काठमांडू (नेपाळ) असा प्रवास केला. २६ मे ते ३० मेपर्यंत त्याने काठमांडूत मुक्काम केला. ३० मे रोजी त्याला नेपाळच्या सोनोली सीमेवर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि गुंडा स्कॉडने ताब्यात घेतले. प्रत्येकवेळी मोबाईमध्ये वेगवेगळे सिमकार्ड पोलिसांपासून बचाव करण्यासाठी निलेश चव्हाणने नियोजनबद्ध आखणी केली होती. अॅानलाइन ट्रान्झेक्शन केल्यास लोकेशन उघड होईल या भीतीने त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत ठेवली. मित्रांकडून चार-पाच मोबाईल आणि सिम कार्ड मिळवले होते. काही सिम कार्ड नेपाळमधून खरेदी केले होते. तो प्रत्येक वेळी मोबाईमध्ये वेगवेगळे सिमकार्ड वापरत होता. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्याने काही वकिलांशी अॅानलाईन कॅालिंगचा वापर केला होता, अशी माहिती आहे. निलेश चव्हाण कोण? वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचे सासरे, सासू, पती, नवरा, दीर यांना अटक केली आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी हगवणे जगताप हिने निलेश चव्हाण हा कुटुंबातील भांडणात यायचा. कोथरूड येथील कार्यालयात मीटिंग होत होत्या, अशी माहिती दिली होती. त्यानंतर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर समोर आली आहे. २००९ मध्ये त्याच्यावर वारजे पोलिसांत गैरप्रकाराची एनसी दाखल झाली होती. हिंजवडी पोलिसांत ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. २०२२ मध्ये त्याच्या पत्नीनेही त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तसेच वैष्णवीचे आई, वडील त्याच्याकडे वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. आता त्याची रिव्हॅाव्हर परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत. धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नेपाळ सीमेवरून निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्यानंतर आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी त्याच्याजवळील मोबाईल आणि सिम कार्ड्स तपासण्याला सुरुवात केली आहे. आता या प्रकरणात आणखी माहिती येणार शक्यता आहे.