वसई – विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली आहे. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी आहेत. जयेश घरत (२८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनूसार, विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे महावितरणच्या रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळीच्या सुमारास महावितरणच्या वटार विभागाचे चार कर्मचारी दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढले होते. मात्र अचानक पणे वीज प्रवाहित होऊन चौघांना विजेचा धक्का लागला. यात तीन जण बाहेर फेकले गेले तर जयेश घरत हा त्यावरच अडकून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचले. जयेश हा अर्नाळा नवापूर जवळील जांभूळपाडा या भागात राहणारा आहे. याशिवाय टेनिस क्रिकेटमध्येही जयेश हा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला आला होता.