Nagar | श्रीगोंद्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत झुंपली

नगर, {जयंत कुलकर्णी} – नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाच्या जागांबाबत महाविकास आघाडीत अजूनही चर्चेेचे गुर्हाळ संपले नसल्याचे दिसत आहे. त्यात श्रीगोंदा विधानसभेसाठी शिवसेना उबाठा गटाने अनुराधा नागवडे यांना एबी फॉम देऊन उमेदवारी जाहीर केल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. परस्पर उबाठा गटाने ही उमेदवारी दिली आहे.
ज्या श्रीगोंदे तालुक्यात शिवसैनिक नाही अशा मतदारसंघात सेनेने उमेदवारी देणे योग्य नाही. या जागेच्या बदल्यात पारनेर, नगर, कोपरगाव या जागा देण्याची तयारी शरद पवार गटाने दर्शविली आहे. पण श्रीगोंदा आम्हाला द्या असा आग्रह शरद पवार गटाने धरल्याने सध्या या जागा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरली आहे.
दरम्यान, काँग्रेसला जिल्ह्यात तीन मतदारसंघ वाट्याला येणार असतांना आता आणखी एक अकोले मतदारसंघ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी काँगे्रेस प्रयत्नशिल असल्याचे सांगण्यात आले आहे.
या सर्व घडामोडी पाहता महाविकास आघाडीत अद्यापही जिल्ह्यातील जागांचा घोळ अजून सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट व काँगे्रसने जिल्ह्यातील अनुक्रमे आठ ते सात जागांचा दावा केला होता.
त्यापैकी श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड, राहुरी, कोपरगाव, अकोले, नगर, पारनेर या जागा राष्ट्रवादीने तर काँगे्रसने नगर, श्रीगोंदा, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले या सात जागांची मागणी केली होती.
मात्र सध्या तरी काँग्रेसला संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर या तीन जागा निश्चित करण्यात आल्या आहे. त्या जागांचे उमेदवार देखील निश्चित झाले असून त्यांची नावे रात्री उशीराने जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात संगमनेरमधून आमदार बाळासाहेब थोरात, श्रीरामपूरमधून आमदार लहू कानडे तर शिर्डीतून प्रभावती घोगरे यांचे नाव आहे.
आज आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रभावती घोगरे यांनी काँगे्रेसमध्ये प्रवेश केला असून त्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याची लढत देणार आहे. त्यात आता अकोले मतदारसंघ देखील काँगे्रसच्या वाट्याला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी आमदार व भाजपचे नेते वैभव पिचड हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांना ही उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव आहे.त्यावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागांमध्ये आदलाबदल होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या श्रीगोंद्याची जागा शरद पवार गट व शिवसेना उबाठा याच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यातून दोन्ही पक्षात सध्या झुंपली असून दोन्ही ही जागा सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे शरद पवार गटाला ही जागा महाविकास आघाडीत सोडण्यात आली होती.
मात्र अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुराधा नागवडे यांना पक्षात प्रवेश देऊन लगेच उमेदवारी दिली. पक्षाचा एबी फॉम देखील दिला. परस्पर सांगली पॅटर्न राबविण्यात आल्याने शरद पवार गट नाराज झाला आहे.
आता पवार गटाने या जागेच्या बदल्यात पारनेर, नगर, कोपरगाव सह अन्य कोणतीह जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. ज्या मतदारसंघात शिवसेना पक्ष मोठा आहे. त्या जागा देण्यास पवार गट तयार आहे. पण ज्या श्रीगोंदे मतदारसंघात शिवसैनिक नाही अशा मतदारसंघाची जागा घेऊन उपयोग होणार नाही असे शरद पवार गटाचे म्हणणे आहे.
परंतू अजूनही या जागेचा तिढा काही सुटलेला नाही. दरम्यान, शनिवारी जिल्ह्यातील जागांचे चित्र स्पष्ट होणार असून त्यानंतर उमेदवारांना एबी फॉमचे वाटप होणार असल्यउाचे सांगण्यात आले आहे.
महायुतीमध्ये तीन जागांचा तिढा
महायुतीमध्ये देखील जिल्ह्यातील तीन जागांचा तिढा सुटलेला नाही. नेवासा, संगमनेर व श्रीरामपूर या तीन जागांवर शिंदे गट व भाजपने दावा केला आहे. त्यामुळे या चा प्रश्न आता थेट दिल्ली दरबारी गेल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाने या तीन जागांचा जोरदार आग्रह धरला आहे.





