Sanjay Raut : ‘महाविकास आघाडी तुटल्याचे म्हटले नाही…’; संजय राऊतांचा यू-टर्न

Sanjay Raut – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा ठाकरेसेनेने दिल्याने महाविकास आघाडीच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यानंतर ठाकरेसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडी तुटल्याचे आम्ही म्हटले नाही, अशी सारवासारव त्यांनी केली.
राऊत यांनीच नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ठाकरेसेनेचा स्वतंत्रपणे लढण्याचा इरादा जाहीर केला. ठाकरेसेना महापालिका, जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवेल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील पीछेहाटीनंतर विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील दरी रूंदावल्याचे मानले गेले.
राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या पार्श्वभूमीवर, राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण देतानाच कॉंग्रेस नेत्यांवर पलटवार केला.
कॉंग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य व्यवस्थित ऐकायला हवे. त्यांनी ऐकण्याची सवय ठेवावी. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही इंडिया आघाडी बनवली. विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीचा भाग बनलो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. त्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात असे मी म्हणालो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या आहेत. स्थानिक निवडणुकांत स्वतंत्रपणे लढलो तर आमची ताकद वाढेल. महाविकास आघाडी तुटल्याचे आम्ही म्हटले नसल्याने आमची भूमिका कुणाला झोंबण्याचे कारण नाही. भाजपशी युती असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आम्ही वेगळे लढलो होतो.
बूथ स्तरावर कार्य करण्याची आम्हाला गरज आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा आहे. वेगळे लढलो तर आमचे पक्षचिन्ह अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवता येईल. अजूनही लोक पक्षचिन्हाबद्दल संभ्रमात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचण्याची संधी मिळते. सर्वच पक्षांची साधारणपणे तशी भावना असते, असा जोरदार युक्तिवाद राऊत यांनी केला.





