मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत काही मुद्द्यांवरुन चांगली खडाजंगी झाली आहे. या बैठकीत अजूनही पीडित शेतकऱ्यांना हवी तशी वेगाने मदत दिली जात नसल्याने अनेक वरिष्ठ मंत्री नाराज असल्याचे पाहायला मिळाले. सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत विविध प्रकारच्या २४०० आजारांसाठी मान्यता देण्यात आली.२३९९ आजारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. तर, गंभीर आजारांसाठी १० लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या बैठकीमध्ये पुन्हा मदत पोहोचली नसल्याची तक्रार काही मंत्र्यांनी केली, फक्त मराठवाड्यात नाही तर कोकणात देखील भात पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे कोकणातील सेना-भाजपच्या मंत्र्यांनी सांगितले, तिथे देखील मदत देण्याचे प्रशासनाला निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय १ – विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जास शासन हमी देण्यास मान्यता. २ – नागपूरातील लक्ष्मी नारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता. ३ – सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी येथील असंघटित कामगारांच्या प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या ३० हजार गृहप्रकल्पास अनर्जित रक्कम, अकृषिक करातून सवलतीस मान्यता. ४ – वाशिम जिल्ह्यातील मौजे वाईगोळ येथील १.५२ हे.आर. जागा भक्त निवास व यात्रेकरूंसाठीच्या सोयी-सुविधासाठी विनामूल्य देण्यास मान्यता. ५ – पुणे जिल्ह्यात घोडनदी (शिरुर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तसेच शासकीय अभियोक्ता कार्यालय स्थापनेस मान्यता. ६ – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय होणार. ७ – राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी बंद करण्यास मंजुरी. ८ – ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन देण्यासाठी असलेल्या कर वसुलीच्या अटीत सुधारणा. ९ – मत्स्यव्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना बँकाकडून देण्यात येणाऱ्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवलाच्या कर्जावर ४ टक्के व्याज परतावा देण्यास मान्यता. १० – हिंद-की-चादर श्री. गुरुतेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रमास आवश्यक निधीस मान्यता. ११ – प्रस्तावित महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश, २०२५ मधील तरतुदीमधील सुधारणांना मान्यता. १२ – मौजे वांद्रे येथील ३० वर्षासाठी एक रुपया वार्षिक भाडेपट्टयाने प्रदान केलेल्या ६४८ चौ.मी. शासकीय जमिनीसमोरील ३९५ चौ.मी. भुखंडावर आवश्यक सोयी-सुविधेस मान्यता. १३ – अकृषिक कर आकारणी तसेच जमिनीच्या अकृषिक वापराच्या परवानगी व सनदेबाबतच्या तरतुदींमधील सुधारणांना मान्यता. १४ – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करणाऱ्या क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांच्या मानधनात वाढीस मंजुरी. १५ – नागरिकांना चांगले उपचार व्हावेत यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारांच्या यादीत सुधारणेस मान्यता. १६ – राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करणार. १७ – परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ व श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांना मंजुरी. १८ – बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकांची पाच पदे निर्माण करण्यास मान्यता. १९ – वर्धा शहरातील रामनगर येथील भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकाला निवासी भूखंड कायमस्वरुपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी. २० – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता. २१ – चंद्रपूर जिल्हयातील मुल येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन पदविका अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतन सुरु करण्यात मान्यता.