Garbage Issue – तळेगाव दाभाडे शहरात कचऱ्याची समस्या पुन्हा डोके वर काढत आहे. अनेक भागांत अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्य चौक, रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदेच्या कचरा संकलन गाड्या नियमित येत असल्या तरी नागरिकांकडून शिस्त पाळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गाडीची वेळ चुकल्यास कचरा थेट रस्त्यावर टाकला जातो. काही ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्येही कचरा फेकण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भटकी कुत्री व जनावरे कचरा पसरवत असून परिसर अधिक अस्वच्छ होत आहे. जिजामाता चौक, दाभाडे एम्पायर परिसर आणि बाजारपेठेतील काही भागांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर आहे. हॉटेल्स व फेरीवाल्यांकडून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्याने समस्या वाढत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कचऱ्यातून रोगराई पसरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने वेळोवेळी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. अन्यथा तळेगावातील कचरा समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.