Indapur Temperature : इंदापुरात ४० अंशांचा टेंपरेचर टॉर्चर! दुपारच्या वेळी रस्ते ओस, तालुक्यात जणू अघोषित कर्फ्यू
Indapur Temperature : वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील जलस्त्रोत आटले; विहिरींची पाणीपातळी घटल्याने अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईचे सावट.

Indapur Temperature – एप्रिलच्या अखेरीसच इंदापूर तालुक्यात उष्णतेने विक्राळ रूप धारण केले असून, तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. निमगाव केतकी, भिगवण, वालचंदनगरसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये दुपारच्या सुमारास ‘कर्फ्यूसारखे’ वातावरण निर्माण होत असून नागरिक घरातच बंदिस्त राहण्यास भाग पडत आहेत.
सकाळपासूनच सूर्याच्या कडक किरणांनी अंगाची लाहीलाही होत असून, दुपारी १२ ते ४ या वेळेत उकाडा असह्य पातळीवर पोहोचत आहे. परिणामी, मुख्य बाजारपेठा, रस्ते आणि चौक ओस पडलेले दिसत आहेत. अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे नागरिकांनी टाळल्याने दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे.
शेतीकामांवर मोठा परिणाम
उष्णतेच्या तीव्रतेचा सर्वाधिक फटका शेतकरी व मजूर वर्गाला बसत आहे. शेतकरी सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच कामे उरकण्याचा प्रयत्न करत असले तरी दिवसाढवळ्या शेतात काम करणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेती नियोजनावर परिणाम होऊन खरीपपूर्व तयारीत अडथळे निर्माण होत आहेत. तालुक्याच्या हद्दीतील प्रत्येक गावात थंड पेय दुकानांवर गर्दी होताना दिसते आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांचा ओघ थंड पेय व पाण्याच्या दुकानांकडे वाढला आहे.
शहरासह ग्रामीण भागातही कोल्ड ड्रिंक्स, उसाचा रस, लिंबूपाणी यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. पाणीटंचाईची चाहूल प्रत्यक्ष जाणवू लागलेली आहे.वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे संकेत दिसू लागले आहेत.विहिरी व बोअरवेल्सची पाणीपातळी झपाट्याने घटत असून काही गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. येत्या काळात ही समस्या अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
उष्णतेमुळे लहान मुले,वृद्ध आणि आजारी व्यक्तींवर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.डोकेदुखी,चक्कर, अशक्तपणा यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
प्रशासनाच्या उपाययोजनांची गरज
आरोग्य विभागाकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे,डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे, तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.मात्र, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





