बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले! ‘महारेरा’ने 1137 प्रकल्पांची नोंदणी केली रद्द, 1,750 योजनांचे काम थांबवले

मुंबई – महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाने अर्थात महारेराने राज्यातील 1,137 प्रकल्पाची नोंदणी रद्द केली असून 1,750 योजनांचे काम थांबवले आहे. यात मुंबई आणि पुण्यातील सर्वाधिक प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे पुणे, मुंबईसह राज्यातील बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
महारेराच्या नियमानुसार, प्रकल्पांची नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व माहिती महारेराच्या वेबसाइटवर अपलोड करणे गरजेचे असते. परंतु बिल्डरांनी प्रकल्पाची माहिती वेबसाइट्सवर अपलोड केली नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत. याचपार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील प्रकल्पावर महारेराकडून कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना महारेराने घर विकत घेणाऱ्यांना खबदारीच्या सूचनाही केल्या आहेत.
महारेरामध्ये नोंदणी असलेल्या प्रकल्पामध्ये गुंवणूक करण्याचा सल्ला देतानाच विकसकांना महारेरामध्ये नोंदणी करताना तुमचा प्रकल्प पूर्ण कधी होणार? यासंदर्भात माहिती देऊन त्या तारखेनुसार प्रकल्प पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत, त्याच प्रकल्पांना महारेराकडून भोगवटा प्रमाणपत्र मिळणार आहे.
मात्र अपूर्ण प्रकल्पांसाठी बिल्डरांना आपल्या प्रकल्पांची नोंदणी करता येणार नाही, तसेच त्यांच्या प्रकल्पाची पुर्ननोंदणी सुद्धा होणार नाही आहे. त्यामुळे आता बिल्डरांनी महारेराच्या निर्देशानुसार कोणतेही पाऊल उचलले नाही तर त्यांची बँक खाती गोठवली जाणार, त्यांना फ्लॅट विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आणि प्रकल्पाच्या जाहिराती करण्यासही बंदी करण्यात येणार आहे.
6638 प्रकल्पांना नोटीस
महारेराने मुंबई, पुणे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील 6638 प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. त्यात 3751 प्रोजेक्ट्सकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित 2,887 योजनांमध्ये 1,137 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यात आली, तर 1,750 योजनांची नोंदणी थांबवण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रकल्प मुंबई महानगरातील 761 प्रकल्प आहेत. मुंबई शहरातील 48 मुंबई उपनगरांमधील 115 तर पालघरमधील 216 आणि ठाणे विभागातील 182 प्रकल्प आहेत. यानंतर पुण्यातील 628, उत्तर महाराष्ट्रातील 135, विदर्भातील 110, मराठवाडातील 100, दादरा नगर हवेलीमधील 13 आणि दमनमधील 3 प्रकल्प आहेत.





