MahaRERA : महारेराने (MahaRERA) जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या एक वर्षाच्या कालावधीत 6945 तक्रारी निकाली काढल्या आहेत. या काळात 5 हजार 73 तक्रारी दाखल झालेल्या. यावर्षी तक्रारी निकाली काढण्याचे हे प्रमाण 137% असून हा आतापर्यंतचा विक्रम आहे. जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा (MahaRERA) जाणीवपूर्वक, नियोजनबद्ध पद्धतीने आणि सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे तक्रारदार घर खरेदीदार यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. दरवर्षी तक्रारी नोंदवल्या जाण्याचे प्रमाण सुमारे 5 हजार आहे. सध्या प्रलंबित तक्रारींचे प्रमाण सुमारे 6 हजाराच्या आसपास असले तरी यातील महिन्या दोन महिन्यांपूर्वी नोंदवलेल्या तक्रारी सोडता बाकी सर्व तक्रारींची सुनावणी प्रक्रियाही सुरू झालेली आहे. MahaRERA महारेराची (MahaRERA) स्थापना मे 2017 ला घरखरेदीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण करीत असताना स्थावर संपदा क्षेत्राचे नियमन आणि त्याला यथोचित प्रोत्साहन देण्यासाठी झाली. महारेराच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या 7 वर्षात 23 हजार 854 तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींपैकी 14,902 तक्रारींचा निपटारा या कालावधीत करण्यात आला. म्हणजे या 7 वर्षात तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण 50 ते 70 टक्के एवढे होते . या उलट गेल्या 2 वर्षात घर खरेदीदारांच्या तक्रारी निकाली काढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून या काळात 10 हजार 235 तक्रारी दाखल झालेल्या असताना प्रत्यक्षात 13 हजार 3 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. हे प्रमाण 127% पेक्षा जास्त आहे. वर्ष – 2024 – 2025 तक्रारी- 3868 – 5073 निकाली तक्रारी- 4775 – 6974 टक्केवारी. 123% – 137%