भारतात गेल्या 10 वर्षांत दररोज 35 किमी रस्ता बांधला गेला, 50 हजार किमी प्रकल्प पूर्ण

नवी दिल्ली- भारताने गेल्या दशकात पायाभूत सुविधा विकसित करण्यात अभूतपूर्वक क्रांती केली आहे. या कालावधीत रस्ते विकासावरील गुंतवणूक सात पटीने वाढली असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील जिंदाल यांनी दिली.
पायाभूत सुविधा क्षेत्रावरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दशकात भारताने प्रत्येक दिवसाला 35 किलोमीटर रस्त्याची निर्मिती केली आहे. या कालावधी 830 प्रकल्प पूर्ण झाले आणि 50 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण झाले. आणखी 460 प्रकल्प कार्यान्वित असून यातून 15 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित होत आहेत.
पर्यावरण संतुलन राखत या रस्त्याची निर्मिती करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने रस्ते निर्मितीसाठी जगातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दीर्घकाळ जाणवणार असल्याचे ते म्हणाले. या रस्ते निर्मितीमुळे भारताचा उद्योग आणि व्यापार वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.





