मुंबई : महारेराने (Maharera) ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या दरम्यान घर खरेदीदार ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत तब्बल 5267 तक्रारी निकाली काढल्या आहेत. एवढेच नाही तर महारेराकडे जुलै अखेरपर्यंत दाखल झालेल्या घर खरेदीदारांच्या तक्रारींची पहिली सुनावणीही झाली किंवा त्यातल्या काहींच्या सुनावणीसाठीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. घरखरेदीदार आयुष्याची कमाई गुंतवून घर नोंदवतो. परंतु काही कारणाने आश्वासित वेळेत ताबा मिळाला नाही, गुणवत्ता बरोबर नाही, घर खरेदी करारात मान्य केलेल्या सोयी सवलती आणि इतरही काही बाबी नाहीत, अशा स्वरूपाच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. या घरखरेदीदारांच्या न्यायोचित हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे. त्यामुळे महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद वेळच्यावेळी घेतली जावी. न्याय्य दिलासा दिला जावा. यासाठी महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक आणि त्यांचे सहकारी महारेरा सदस्य एक महेश पाठक आणि महारेरा सदस्य दोन रविंद्र देशपांडे यांनी तक्रारींबाबत सुनावण्यांची गती वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या या नियोजनाला यश येऊन इतके दिवस अनेक कालावधीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा या तिघांनी लावला आहे. ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 या काळात या तिघांनी तब्बल 5267 तक्रारींबाबत यथोचित निर्णय घेऊन घर खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला. प्रत्यक्षात या काळात 3743 तक्रारी दाखल झालेल्या होत्या. तक्रारी दाखल झाल्यानंतर महिन्या-दोन महिन्यांत त्याची नोंद घेऊन सुनावणी झालेली आहे. सद्या ५७९२ तक्रारी मे 2017 ला महारेराची स्थापना झाली. तेव्हापासून महारेराकडे 30833 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी 23,726 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. यात महारेरा स्थापनेपूर्वीच्या 3523 प्रकल्पातील 23661 तक्रारी आहेत, तर महारेराच्या स्थापनेनंतर 2269 प्रकल्पांच्या अनुषंगाने 6,218 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. महारेराच्या स्थापनेनंतरच्या तक्रारींचे प्रमाण 21 टक्के आहे, तर स्थापनेपूर्वी हे प्रमाण 79 टक्के आहे. सद्या राज्यात 51,481 प्रकल्प नोंदणीकृत असून यापैकी 5792 प्रकल्पात तक्रारी आलेल्या आहेत.