Pune District : महाराष्ट्राचे ’दादा’ : जननेत्याला एका कार्यकर्त्याची भावपूर्ण श्रद्धांजली
Pune District : माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माध्यमातून आम्हाला लोकसेवेची आणि समाजकारणाची मोलाची संधी मिळाली.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते पदामुळे मोठे ठरतात, तर काही आपल्या कार्यशैलीमुळे, जनसामान्यांशी असलेल्या नात्यामुळे आणि अपार माणुसकीमुळे लोकांच्या मनात कायमचे घर करून जातात. अशाच एका लोकनेत्याच्या अकस्मात जाण्याने महाराष्ट्राने आपला ’दादा’ गमावल्याची भावना आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून जनतेपर्यंत व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपल्या कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अमिट ठसा उमटवणारे आमचे ’दादा’ आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही मन विश्वास ठेवायला तयार नाही. एका साध्या कार्यकर्त्यापासून ते महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदांपर्यंतचा त्यांचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असाच राहिलेला आहे. एका निष्ठावंत कार्यकर्त्याने आपल्या अत्यंत भावनाप्रधान शब्दांत भावना व्यक्त करताना सांगितले की, दादा हे केवळ एक राजकीय नेते किंवा मंत्री नव्हते, तर प्रत्येक लहान-मोठ्या कार्यकर्त्याला कामाची संधी देणारे, त्याच्या क्षमतांवर मनापासून विश्वास ठेवणारे आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र तत्पर असणारे अत्यंत खंबीर नेतृत्व होते.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माध्यमातून आम्हाला लोकसेवेची आणि समाजकारणाची मोलाची संधी मिळाली. या संघटित कामाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी ठोस योगदान देता आले, याचे संपूर्ण आणि असीम श्रेय हे कार्यकर्त्यांनी नेहमीच दादांच्या दूरदृष्टीला आणि आशीर्वादाला दिले आहे. खेड तालुक्याच्या शाश्वत आणि आधुनिक विकासासाठी जेव्हा जेव्हा सौर कृषी प्रकल्पांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची मागणी दादांकडे करण्यात आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कोणतीही लालफितशाही मध्ये न आणता तातडीने प्रशासकीय मंजुरी दिली. दादांच्या या तत्परतेमुळेच खेड तालुक्याच्या विकासाला खरी गती मिळाली.
त्या ऐतिहासिक सौर कृषी प्रकल्पांचे भव्य लोकार्पण खुद्द दादांच्याच शुभहस्ते व्हावे, अशी खेड तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची आणि कार्यकर्त्याची मनोमन इच्छा होती; मात्र नियतीच्या क्रूर खेळाने ती इच्छा अपूर्णच ठेवली, याची आर्त खंत आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात शल्यासारखी खुपत आहे. दादांनी आयुष्यभर महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि समतावादी विचारांचा वारसा खर्या अर्थाने पुढे नेण्याची प्रेरणा आम्हा सर्वांना दिली. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रतीही पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आदरणीय सुनेत्राताई, पार्थदादा आणि जयदादा हे या कठीण काळात सर्व कार्यकर्त्यांना पितृतुल्य आधार देतील आणि दादांचा विचार पुढे नेतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुम्ही खर्या अर्थाने महाराष्ट्राचे ’दादा’ होता. असा नेता पुन्हा होणे नाही! तुमच्या आठवणी, तुमचे विचार आणि तुमचे कार्य आम्ही सदैव जपू. तुम्हाला आमचा अखेरचा जय महाराष्ट्र.! जय राष्ट्रवादी…!!
दादा, आता आम्हाला दुसरं काहीही नको… फक्त तुम्ही पुन्हा एकदा परत या!
दादांची आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन मंत्री करण्याची तीव्र इच्छा होती, मात्र राजकीय घडामोडींमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही, याची एक उरस्फोड खंतही त्यांनी बोलून दाखवली. दादा, आता आम्हाला दुसरं काहीही नको… फक्त तुम्ही परत या, अशी अत्यंत आर्त आणि व्याकुळ भावना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मांडली. आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासात दादांवर विरोधकांकडून अनेक बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करण्यात आले, परंतु ते आरोप कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत. तरीही दादांनी अत्यंत संयमाने, विवेकाने आणि निष्ठेने केवळ सत्यच जनतेसमोर मांडण्याचा निरंतर प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या मते, जर हे बिनबुडाचे राजकीय आरोप झाले नसते, तर दादा निश्चितपणे महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर (मुख्यमंत्रीपदी) विराजमान झाले असते, यात शंका नाही.
दादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातील अत्यंत कठोर वक्तशीरपणा, क्षणात अचूक निर्णय घेण्याची अफाट निर्णयक्षमता, अथांग कुटुंबवत्सल स्वभाव आणि प्रत्येक लहान-मोठ्या नात्याला मनापासून जपण्याची सवय यांचाही कार्यकर्त्यांनी आवर्जून उल्लेख केला. विधानभवनात अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय बैठक सुरू असताना बहिणीच्या सासर्यांच्या निधनाची बातमी समजताच, सर्व राजकारण आणि काम बाजूला ठेवून बैठक अर्धवट सोडून कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी निघालेल्या दादांचा संवेदनशील प्रसंग त्यांनी आठवला.
दादांचा विकास पाहण्यासाठी दुर्बीण नव्हे, तर दूरदृष्टी लागते…
बारामतीच्या मॉडेल विकासातून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट कसा साधता येतो, याचे एक उत्कृष्ट आणि आदर्श उदाहरण दादांनी आपल्या कर्तृत्वातून निर्माण करून दिले. दररोज भल्या पहाटे 5 वाजता उठून स्वतः रस्त्यावर उतरून विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करणारे आणि सामान्य जनतेला वाहतुकीचा किंवा कामाचा कोणताही त्रास होणार नाही, याची अत्यंत बारकाईने काळजी घेणारे हे लोकभिमुख नेतृत्व आज आपल्यात नाही, ही संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी आहे.
खेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दादांनी दिलेले अफाट योगदान अधोरेखित करताना त्यांनी विरोधकांच्या पोकळ टीकेलाही सडेतोड उत्तर दिले. कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे, संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी पर्वतासारखे खंबीरपणे उभे राहणारे आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा निरंतर प्रयत्न करणारे दादा आज आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची कार्यशैली आणि त्यांनी दिलेला विकासाचा प्रदीर्घ वारसा महाराष्ट्राला कायम प्रेरणा देत राहील.
दादांचा विकास
दादांचा विकास पाहण्यासाठी डोळ्यांवर दुर्बीण लावून चालत नाही,
तर त्यासाठी व्यापक दूरदृष्टी लागते
जननेत्यास साकडं
“दादा, आता आम्हाला दुसरं काहीही नको…
फक्त तुम्ही पुन्हा एकदा परत या
गतिमान नेतृत्व
“मागणी केली आणि क्षणाचाही विलंब न करता निर्णय झाला…
खेड तालुक्याच्या सौर कृषी प्रकल्पांना दिलेली मंजुरी म्हणजे दादांच्या तत्परतेचे ज्वलंत उदाहरण
खंबीर पाठीराखा
“कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे, संकटाच्या काळात पाठीशी पर्वतासारखे उभे राहणारे आणि प्रत्येकाला न्याय देणारे आमचे दादा!”
भावपूर्ण आदरांजली
तुम्ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ‘दादा’ होता. असा नेता पुन्हा होणे नाही
तुमच्या आठवणी, तुमचे विचार आणि तुमचे कार्य आम्ही सदैव जपू.
अखेरचा जय महाराष्ट्र.! जय राष्ट्रवादी…!!
शोकमग्न
मा. आमदार श्री. दिलीपशेठ मोहिते पाटील
श्री. रविंद्र (आबा) गायकवाड (सदस्य, विद्युत नियंत्रण समिती, पुणे जिल्हा)
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आजी-माजी पदाधिकारी व तमाम नागरिक





