मुंबई : मागील काही दिवसांपासून वाढलेला उकाडा रविवार, 14 सप्टेंबर 2025 पासून अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसात बदलला. यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले असून, गावागावांत पाणी शिरले आहे. या ढगफुटीसदृश पावसामागील कारण हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. डॉ. अखिल श्रीवास्तव यांच्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात होणार होती. याचवेळी पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि महाराष्ट्रातील काही भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. विशेषत: उत्तर तेलंगणा आणि विदर्भाच्या आसपासच्या भागात हे क्षेत्र सक्रिय झाले आहे. यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 14 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचे क्षेत्र सध्या उत्तर तेलंगणा आणि विदर्भात आहे आणि ते पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने मध्य विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. याशिवाय, ईशान्य बांगलादेश आणि आसामच्या मध्य भागात चक्रवाती वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच, हिंदी महासागरात दोन चक्रवाती परिस्थिती सक्रिय आहेत – एक दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात, तर दुसरी पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रात. महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा या हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 48 तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण-गोवा येथे अतिवृष्टीची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनच्या सक्रिय वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि आसपासच्या भागातही या हवामान प्रणालीचा परिणाम जाणवत आहे, ज्यामुळे राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.