Weather Update : राज्यात पुन्हा मुसळधार; ‘या’ 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी, पूर आणि पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोकण आणि मुंबईत पावसाची विश्रांती
नेहमी पावसाने धुवाँधार बरसणाऱ्या कोकण आणि मुंबई परिसरात सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत ढगाळ वातावरण राहील, तापमान कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाशासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरमधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पुणे, सातारा आणि सांगलीच्या घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या भागात पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
मराठवाड्यात विजांसह पाऊस
मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. धाराशिव आणि लातूरमध्येही जोरदार पाऊस अपेक्षित आहे, तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: 12 सप्टेंबर रोजी वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, भंडारा आणि इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची भीती असल्याने स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातही ढगाळ वातावरण कायम राहील.





