Maharashtra Rain Update: ‘अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका’; नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
Maharashtra Rain Update : पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Update: मुंबईत अनेक भागात दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट कायम ठेवला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर पालघरसह वसई विरार शहरात रेड अलर्ट आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. 10 हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी विविध भागांत तैनात करण्यात आले आहेत.
परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक ती उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ
दुसरीकडे, पुणे शहरासह जिल्ह्यात २ दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे. खडकवासला धरणात १५ टक्के पाणीसाठा साठला आहे.
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याच्या प्रभावामुळे देशाच्या मध्य भागात मान्सून अधिक सक्रिय राहणार आहे. पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील मुंबई प्रदेश, ठाणे, रायगड, पालघर, पुणे आणि नाशिक परिसरात ६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कायम राहू शकतो. काही भागांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
उद्याही पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा:
PMC News: माननियांच्या उपचाराचा खर्च १० कोटींवर! नवीन निर्णयाने पालिकेच्या खर्चात दुपटीने वाढ होणार






