Top 10 News : राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल आणि वैभवचा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक डेब्यू फिका, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे.

राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा;
हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी
Top 10 News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आज आणि पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज आणि 14 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, धरणांमध्ये 10,443 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 25.56 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
ताप,अशक्तपणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणामुळे शनिवारी रात्री ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना आणखी एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिल्याने सोमवारीही ते रुग्णालयातच राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो, मात्र याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपुरात सांगितले की, सततच्या धावपळीमुळे शिंदे यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून सध्या त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे.
साटम हसले, राज ठाकरे भडकले,
आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतोय
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वाद पेटला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई न होणे गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. “सत्तेचा माज आला आहे, पण सरकारकडून कोणताही खेद व्यक्त होत नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. फडणवीस यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अशा लोकप्रतिनिधींना समज देण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनांनंतर नागरिकांमध्ये आधीच संतापाचे वातावरण असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला चाप,
उपचार नाकारल्यास 5 लाखांचा दंड
खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारण्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयक’ विधानसभेत सादर करण्यात आले असून, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार, पैशांअभावी कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारल्यास संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच, खासगी रुग्णालयांमध्ये पारदर्शकता आणि नियंत्रणासाठी राज्य चिकित्सा आस्थापना परिषद स्थापन केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. वैद्यकीय खर्च आणि तपासण्यांचे वाढते दर लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आता या नव्या कायद्याची खासगी रुग्णालयांकडून प्रभावी अंमलबजावणी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अग्रवाल परिवाराला आणखी एक धक्का
केतनच्या आजोबांचं निधन; विशाल अग्रवालांचं स्टेटस Top 10 News :
पुण्यातील लोहगड किल्ला येथील केतन अग्रवाल हत्याकांडामुळे हादरलेल्या अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हत्या झालेल्या 25 वर्षीय केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ‘Miss You Dad’ अशी भावनिक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. देवीचंद अग्रवाल यांच्यावर काही दिवसांपूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, नातवाच्या हत्येचा मोठा मानसिक धक्का बसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. कँडल मार्चदरम्यान त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली होती.
एलपीजीचा भाव 2 हजार रुपयांवर गेला असता,पण…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा
राजस्थानातील बालोतरा याठिकाणी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांबाबत मोठा दावा केला. इंधन संकटाच्या काळात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 2 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकली असती, मात्र सरकारच्या वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे ते टळल्याचे त्यांनी सांगितले. होर्मुझमार्गे होणारा एलपीजी पुरवठा युद्धामुळे विस्कळीत झाल्यानंतर रिफायनऱ्यांना घरगुती एलपीजी उत्पादन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, उत्पादन 35 हजार मेट्रिक टनांवरून 54 हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आले. तसेच, घरगुती एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी 11 लाखांहून अधिक पीएनजी कनेक्शन देण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
भाजपमध्ये भाकरी फिरणार;
संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?
संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्यात नुकतीच यासंदर्भात बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्तारासह भाजपच्या संसदीय मंडळातही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलांमध्ये महाराष्ट्रातील दोन वरिष्ठ नेत्यांना महत्त्वाची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत जबाबदारी, तर काही पक्ष पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
‘बॉस कोण हे ‘त्यांना’ माहित आहे’
ट्रम्प यांचा नेतान्याहूंना टोला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावर भाष्य केलंय.त्यांनी, “आमचे संबंध चांगले आहेत, पण ‘बॉस’ कोण आहे हे त्यांना माहीत आहे,” अस म्हणत त्यांनी नेतान्याहूंना टोला लगावला. या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात दोन्ही नेत्यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीनंतर ही त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट ठरू शकते. दरम्यान, अमेरिकेच्या 250 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आणि लवकरच भेटण्याबाबत दोघांमध्ये सहमती झाली. मात्र, भेटीची तारीख अजून निश्चित झालेली नाही.
वैभवचा ऐतिहासिक डेब्यू फिका!
आयर्लंडनंतर इंग्लंडकडून भारताचा दारुण पराभव
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी कायम आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत इतिहास रचला. मात्र त्याला म्हणावी तशी धडाकेबाज कामगिरी करण्यात यश आले नाही. भारताने प्रथम फलंदाजी करत 191 धावांचे आव्हान दिले. मात्र, इंग्लंडने आक्रमक फलंदाजी करत 19व्या षटकातच 4 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. या विजयासह इंग्लंडने मालिकेतील आपले वर्चस्व आणखी मजबूत केले.
डीपफेकविरोधात प्रीती झिंटाची न्यायालयात धाव;
न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय Top 10 News :
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा यांनी AI तंत्रज्ञानाच्या गैरवापराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया आणि विविध वेबसाइट्सवर तिचे AIने तयार केलेले डीपफेक फोटो, व्हिडिओ आणि मॉर्फ केलेले संदेश प्रसारित होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, भविष्यात अशा प्रकारचा अनधिकृत मजकूर प्रकाशित होऊ नये, यासाठीही निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. AI डीपफेकच्या वाढत्या गैरवापरामुळे कलाकारांच्या प्रतिमेला धोका निर्माण होत असल्याची चिंता प्रीती झिंटा यांनी व्यक्त केली आहे.




