Ram Raksha Andolan : रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा! भाजपचा उद्धव ठाकरेंवर बोचरा वार
Ram Raksha Andolan : या आंदोलनाची घोषणा नुकतीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केली होती. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहनही त्यांनी केलं होतं.

Ram Raksha Andolan : देशभरात अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची चर्चा असून या प्रकरणामुळे राजकारण देखील चांगलचं तापलं आहे. राम मंदिरातील अपहार या मुद्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आज ५ जुलैपासून मुंबईतील दादर येथील हनमान मंदिर येथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रामरक्षा आंदोलन छेडण्यात येणार आहे.
या आंदोलनाची घोषणा नुकतीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केली होती. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहनही त्यांनी केलं होतं. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर भाजपकडून बोचरा वार करण्यात आला आहे. “जनाधार गमावल्यानंतर रामरक्षा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पक्षरक्षा करावी,” असा बोचरा वार भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नवनाथ बन ?
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी साधुसंतांसह देशभरातील दिग्गज उपस्थित होते. तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून होते. प्रभू रामलल्लाच्या दर्शनासाठी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे त्यांना वाटले नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसची त्यांना भीती होती. आता जनाधार गमावल्यानंतर रामरक्षा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पक्षरक्षा करावी”, असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.
हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी कारस्थान : नवनाथ बन
पुढे बोलताना नवनाथ बन म्हणाले, “प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिरात अपहार करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एवढेच काय तर त्या आरोपींना वकीलही मिळू नये यासाठीही सारेजण प्रयत्न करत आहेत. पण, तुम्ही मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी कारस्थान आखण्याचा प्रयत्न करत आहात”, अशी घणाघाती टीकाही केली.
राज्यव्यापी ‘रामराम रक्षा’ आंदोलनाची घोषणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्यव्यापी ‘रामरक्षा आंदोलन’ छेडण्याची मोठी घोषणा केली. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा करत भाजपवर जोरदार टीका केली आणि हा केवळ राजकीय नव्हे तर श्रद्धा आणि हिंदूंच्या भावनांशी संबंधित मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.





