Maharashtra Rain : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरुच; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Maharashtra Rain – गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने राज्यात चांगलाच धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूरससह राज्याच्या सर्वच भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे. असे असले तरी राज्यातील सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने उसंती दिली होती. मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. तर जलालखेडा येथील पुनर्वसन परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील शेकडो एकर शेतातील पीके पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या भागातील शेतीत सोयाबीन, तूर, कपासी, संत्रा, मोसंबी व फळ भाज्यांची लागवड केली जाते. पुरामुळे या पिकांचे नुकसान झाले. जलालखेडा, मदना भारसिंगी, वाढोणा, मेंढला, सिंजर, थडीपनी, जामगाव, देवग्राम, मुक्तापूर, महेंद्री तसेच नरखेड तालुक्यात मुसळधार पाउस झाला.
त्यामुळे या भागातील नदी-नाल्यांना पुर येऊन शेकडो एकर शेती पाण्याखाली आली. सामान्यांचे झालेले नुकसान बघता शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व गावकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
कल्याण शहरातील काळू नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नदीचे पाणी टिटवाळा शहर परिसरातील सखल भागात शिरले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या, चाळींचा भाग, रस्ते जलमय झाले आहेत. बाह्यवळण रस्त्याच्या सखल भागात पाणी साचले आहे.
शहरातील गणपती मंदिरा जवळील पटेल मार्ट परिसरातील भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. वाहनांना रस्ते मार्गावरील पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. वसई शहरातील लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये देखील पावसाच्या पाण्याने शिरकाव केला आहे.
बुधवारी नाशिक जिल्ह्यातील १४ धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला. जिल्ह्यातील ११ धरणे तुडूंब झाली असून अन्य आठ धरणांची तीच स्थिती आहे. गंगापूर धरणाच्या विसर्गात मोठी वाढ होत असल्याने गोदावरी नदीची पातळी उंचावत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात ७० टक्के जलसाठा आहे.
बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून पावसामुळे अतिरिक्त पाणी सोडावे लागत आहे. या धरणांमध्ये पावसाचे येणारे पाणी साठविण्यासाठी आता फारशी जागा शिल्लक नाही. धरण सुरक्षित राखण्यासाठी खालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन विसर्ग करावा लागत आहे.
पावसाचा जोर ओसरणार
गेल्या दोन तीन दिवसांपासून आरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात सर्वदूर पाऊस झाला. पावसाचा हा अंदाज वेधशाळेने बुधवारपर्यंतच दर्शविला होता. बुधवारनंतर पावसाचा जोर ओसरणे अपेक्षित असल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे.





