Rain Alert : राज्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले असतानाच आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० ते २२ एप्रिलदरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Alert) सध्या कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. उष्णतेचा त्रास वाढलेला असताना सांगली जिल्ह्यात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Rain Alert) २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाचे प्रमाण आणि क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र २२ एप्रिलपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत, तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीट यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शेतमाल आणि भाजीपाला उघड्यावर ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे. (Rain Alert) याशिवाय विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. येथे तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचले असून रात्रीचे तापमानही ३० अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे दिवसासह रात्रीही उकाडा जाणवत असून पुढील काही आठवडे तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Rain Alert)