पुणे – सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ व २६ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिले दोन दिवसीय बीज संमेलन होणार आहे. हे संमेलन भारती विद्यापीठाच्या पुणे- सातारा रोड येथील धनकवडी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनात बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये व सन्मान पत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सह्याद्री देवराईचे संस्थापक अध्यक्ष व अभिनेते सयाजी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, विचारभारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते. ‘एकतरी झाड लावूया चला सावली पेरूया ‘ हे या संमेलनाचे बोधवाक्य आहे. सह्याद्री देवराईचे दहा तज्ञ सदस्य भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना ताम्हिणी घाटात सकाळी ७ ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत बीज संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी भारती विद्यापीठातील इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार असून भारती विद्यापीठाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी आणि सह्याद्री देवराईचे पर्यावरणप्रेमी मिळून राज्यातून बिया गोळा करणार आहेत. हरित संपत्तीचे दालन या प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी राहीबाई पोपेरे यांना जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायक आर्चाय पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांतून भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांची बीजतुला करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदाना विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.