Chakan MIDC: उद्योजकांच्या अडचणींवर 16 ऑगस्टला बैठक! उद्योगमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार
Chakan MIDC: खराब पायाभूत सुविधांमुळे उद्योग स्थलांतरित होण्याच्या भीतीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; उद्योजकांच्या अडचणी दूर करून ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन.

Chakan MIDC – चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुर्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नांची गंभीर दखल घेतली आहे. उद्योजकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे औद्योगिक संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात येणार आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांमधून सातत्याने वृत्त प्रसिद्ध होत आहे. खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अन्य पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे उद्योगांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांचा परिणाम उद्योगांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच कामगारांच्या वाहतुकीवरही होत आहे.
चाकणमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास काही उद्योग महाराष्ट्राबाहेर अथवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधींवर परिणाम होण्याची भीती उद्योजकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकार्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
केवळ बैठका आणि चर्चांपुरता प्रश्न न ठेवता प्रत्यक्ष औद्योगिक परिसरातील परिस्थिती समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने 16 ऑगस्टची बैठक आयोजित करण्यात आली आहे. चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र आहे. येथे मोठ्या प्रमाणावर उद्योग, उत्पादन प्रकल्प आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि उद्योजकांच्या अडचणी दूर करणे याला शासनाचे प्राधान्य असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. बैठकीत रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक व्यवस्था, औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा आणि संबंधित विभागांमधील समन्वय या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्योजकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
उद्योगांचे स्थलांतर रोखण्यावर भर
चाकणमधील उद्योगांना अनुकूल वातावरण मिळणे आवश्यक असून, विद्यमान उद्योगांचे संरक्षण आणि रोजगाराच्या संधी कायम ठेवण्यासाठी शासन व औद्योगिक क्षेत्र यांच्यात समन्वय आवश्यक आहे. उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न बैठकीतून केला जाणार आहे. दरम्यान, चाकणमधील औद्योगिक संघटनांनीही उद्योगमंत्र्यांसोबत होणारी बैठक सकारात्मक पद्धतीने घेण्याचे आश्वासन दिले आहे.






