Maharashtra Politics : ठाकरेंच्या खासदारांना नेमकं कुठे ठेवलंय? लोकेशन आले समोर
राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक (Maharashtra Politics) बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याचे वृत्त असून, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक (Maharashtra Politics) बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याचे वृत्त असून, हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.
या घडामोडींनंतर तातडीने या 6 खासदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली असून, त्यांना केंद्र सरकारकडून ‘वाय प्लस’ (Y+) सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत या सर्व खासदारांना दिल्लीतून अज्ञात स्थळी (Maharashtra Politics) हलवण्यात आले होते, ज्यामुळे हे खासदार नेमके कुठे गेले? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
अखेर या खासदारांचे ‘लोकेशन’ समोर आले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा पर्दाफाश केला आहे.
खासदारांना २५ कोटी मिळाले
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी थेट आकड्यांसह गंभीर आरोप करत म्हटले की, “त्या फुटीर खासदारांना प्रत्येकी २५ कोटी रुपये मिळाले आहेत. अगदी काल रात्रीच त्यांना १०-१० कोटी रुपये सुपूर्द करण्यात आले. या सर्व खासदारांना सध्या राजस्थानमधील एका सुरक्षित ठिकाणी (रिसॉर्ट/जागेत) हलवण्यात आले आहे.”
गिरीश महाजनांना थेट आव्हान
यावेळी भाजप नेते आणि संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांच्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. “खासदार कसे फुटले?” या महाजनांच्या सवालाला उत्तर देताना राऊत संतप्त झाले. ते म्हणाले, “तुम्ही खाकी वर्दी, ईडी आणि सीबीआयची मस्ती दाखवत आहात. माझ्याकडे जर फक्त एक दिवसासाठी सीबीआय आणि ईडीचे अधिकार आले, तर सर्वात आधी गिरीश महाजन यांना फोडून दाखवेन. केवळ अर्धा तास ईडी-सीबीआय आमच्या हातात द्या, गिरीश महाजन स्वतः पहिले फुटतील. हा माणूस आम्हाला काय शिकवतो? कुंभमेळ्याची कंत्राटं कुणाला दिली, याची संपूर्ण यादीच माझ्याकडे आहे.”
गद्दारांना सुरक्षा कशासाठी?
बंडखोर खासदारांना आणि नेत्यांना दिलेल्या सुरक्षेवरूनही राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. “जर तुमच्यात हिंमत आहे आणि तुम्हाला भीती नाही, तर मग तुमचे नगरसेवक ठाण्यात का लपवून ठेवता? आमच्याकडे राडे करण्याची क्षमता नाही असं म्हणता, मग या खासदारांना वाय प्लस सुरक्षा, सीआरपीएफची सेक्युरिटी का दिली आहे? त्यांच्या घरावर आणि मालमत्तेवर एवढा कडक बंदोबस्त कशासाठी? प्रत्येक गद्दाराला सुरक्षा देण्याचे कारण काय?” असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “गिरीश महाजन यांनी पोलिसांच्या गाड्या बाजूला ठेवून समोर यावे. राडेबाजीवर आम्हाला आव्हान देऊ नका. एकदा सुरक्षा काढून बघा, तुमच्या अंगावर चिंधीही राहणार नाही. तुमचे बॉस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः एवढी सुरक्षा घेऊन फिरतात, त्यांच्या चिरंजीवांकडेही (खासदार श्रीकांत शिंदे) मोठा सुरक्षा ताफा आहे.”
या संपूर्ण बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली असून, आगामी काळात ठाकरे गट आणि सत्ताधारी महायुतीमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.






