Maharashtra Politics : मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर…
Maharashtra Politics : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली असून, १८ जून २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत १६ नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीच्या जागेचाही समावेश आहे. (Maharashtra Politics)
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या प्राथमिक चर्चेनुसार भाजपला १२, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा देण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र, या फॉर्म्युल्यावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत यावर अधिक चर्चा होणार असून काही बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. (Maharashtra Politics)
ही महत्त्वाची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. बैठकीला भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रमुख नेते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या आधारावर जागावाटपाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या भागात संबंधित पक्षाचे संख्याबळ अधिक आहे त्या जागांवर त्या पक्षाने दावा केला आहे. त्यानुसार शिवसेनेकडून ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हिंगोली-परभणी या जागांवर दावा केला आहे. (Maharashtra Politics)
तर भाजपकडून नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर-जालना, सातारा-सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा-गोंदिया, अमरावती, लातूर-धाराशीव-बीड आणि सोलापूर या जागांवर दावा करण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीमध्ये जागावाटपावर लवकरच एकमत होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात या चर्चांना वेग आला आहे. (Maharashtra Politics)





