Maharashtra Kesari 2023 | शिवराज राक्षे बनला डबल महाराष्ट्र केसरी, हर्षवर्धन सदगीरवर केली मात..

धाराशिव – धाराशिव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याला पराभूत करत किताब जिंकला. तो आता डबल महाराष्ट्र केसरी ठरला असून त्याने मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले आहे तर सदगीर याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
धाराशिवच्या श्री तुळजाभवानी स्टेडियमवर गुरुवर्य के. टी पाटील क्रीडांगरीत या स्पर्धा पार पडल्या. राज्यातील जवळपास 900 कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
केसरी किताबाच्या मुख्य लढतीसाठी मूळचा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील मात्र नांदेडचे प्रतिनिधी करणाऱ्या शिवराज राक्षे याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याचा 6-0 अशा गुणाधिक्याने पराभव करत महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.
या सामन्यात काही मिनिटे शिल्लक असताना झालेल्या दुखापतीनंतरही सदगीरने निकराने लढा दिला. सातत्याने मॅटवरील स्पर्धामध्ये खेळत असल्याने शिवराजला चांगलाच अनुभव होता त्यामुळे त्याला लाभ झाला. शिवराजने उपांत्य सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याच्यावर मात करत अंतिम फेरी गाठली होती.
विजयी पैलवान शिवराज राक्षे याला 65 वा महाराष्ट्र केसरी किताब, 30 लाख किंमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आणि मोहोळ घरण्याकडून परंपरागत चालत आलेली चांदीची गदा बहाल करण्यात आली. तर सोबतच उपविजेता मल्ल नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याला महिंद्रा 575 DI व लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली चांदीची गदा देऊन गौरविण्यात आले.





