Maharashtra Kesari 2025 : महाराष्ट्र केसरी आधीच ठरतो, पंचाला जन्मठेप द्या ! कोणी केली मागणी? पाहा…

Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी पुण्याचा ‘पृथ्वीराज मोहोळ’ ठरला आहे. मात्र यंदा स्पर्धेदरम्यान अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. महाराष्ट्र स्पर्धेच्या सामन्यात पैलवान शिवराज राक्षे याने पंचांशी वाद घालत मारहाण केली.
हीच हुज्जत घालणे आणि मारहाण करणे पैलवन शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना चांगलेच भोवलं आहे. या दोनही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतला आहे.
त्यामुळे पुढच्या तीन वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही स्पर्धेत झालेल्या गोंधळानंतर हा मोठा निर्णय घेतला आहे.
उपांत्य सामन्यात पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडले. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली.
दरम्यान, कालच्या या सर्व गोंधळावर आता शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडचे वस्ताद अर्जुनवीर काका पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंचाला जन्मठेप द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
माध्यमांशी बोलताना काका पवार म्हणाले की, “रविवारी कुस्ती बघायला गेलो नाही. कामाच्या निमित्तानं पुण्यातच होतो. पण सामना बघितल्यावर जे काही शिवराजच्याबाबतीत झालं, त्यात राजकारण करण्यात आलंय हे दिसून येत आहे.
‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धाच बेकायदेशीर आहे. तसंच त्यांच्याकडून खेळाडूंना देण्यात येणारं प्रमाणपत्र देखील कोणत्याही कामाचं नाही आणि ते कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. अजूनही महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचं प्रमाणपत्र चालतं.
खेळाडूंना बक्षीस मिळतं या हिशोबानं आम्ही त्यांना स्पर्धेला पाठवतो. मात्र, असं असताना देखील खेळाडूंवर अन्याय होताना पाहायला मिळत आहे. पंचाला जन्मठेप द्या.” असं ते यावेळी म्हणाले.





