Maharashtra Honeytrap : घाटकोपरच्या फ्लॅटवर बांगलादेशी महिलांसह पोलिसांची ‘पार्टी’, ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्रातील हनीट्रॅप प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. नाशिक येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेच्या आरोपांनी खळबळ उडवली आहे. या महिलेने आता स्वतःवर झालेल्या अन्यायाची बाजू मांडत करुणा शर्मा-मुंडे यांच्या पत्रकार परिषदेत गंभीर दावे केले आहेत.
तिने दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांवर (ACP) बलात्काराचा आरोप केला असून, घाटकोपर येथील एका फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना आणून दारूच्या पार्ट्या आणि गैरवर्तन केल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
राज्यातील हनीट्रॅप प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका महिलेवर नाशिक, ठाणे, पुणे आणि मुंबई येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी, आयपीएस, उत्पादन शुल्क अधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. ही महिला मूळची नाशिकची असून, सध्या ठाण्यात वास्तव्यास आहे.
तिने स्वतःला माजी होमगार्ड, विधवा किंवा गरजू महिला पोलीस कर्मचारी म्हणून सादर करत व्हॉट्सअॅप, व्हिडीओ कॉल आणि प्रत्यक्ष भेटींद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर गुप्त कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (ACP) तिच्याविरुद्ध खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे तिला 2016 मध्येही अटक झाली होती. मात्र, तुरुंगातून सुटका झाल्यावर तिने नव्या ओळखींसह आपले कृत्य सुरू ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, मंगळवारी (22 जुलै) मुंबईत करुणा शर्मा मुंडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही महिला उपस्थित होती. तिने स्वतःवर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली. तिच्या म्हणण्यानुसार, एसीपी उत्तम कोळेकर यांनी तिच्याशी ओळख वाढवून तिचा फोन नंबर घेतला आणि तिला कळवा पोलीस ठाण्यात चहासाठी बोलावले. एकदा कोळेकर यांच्या घरी गेल्यावर तिथे त्यांची पत्नी नसून दुसरे एसीपी इंद्रजीत कारले उपस्थित होते. तिथे तिला गुंगीचे औषध देऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला.
एवढंच नाही तर, तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यावर पीआय ढमाळ या महिला पोलीस अधिकाऱ्याने तिला शांत राहण्यास सांगितले आणि तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केला. तिच्यावर आणि तिच्या मुलीवरही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ती म्हणाली, “मला हनीट्रॅप करणारी ठरवले जात आहे, पण खरे गुन्हेगार हे पोलीस अधिकारी आहेत.”
घाटकोपरच्या फ्लॅटवरील गंभीर आरोप
महिलेचा सर्वात धक्कादायक दावा आहे की, घाटकोपर येथील एका 2 BHK फ्लॅटवर हे दोन पोलीस अधिकारी बांगलादेशी महिलांना आणतात. तिथे दारूच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात आणि या महिलांचा गैरवापर केला जातो. तसेच या फ्लॅटवर दारूचे बॉक्स ठेवलेले असतात आणि तिथे अनैतिक कृत्ये घडतात. या आरोपांनी पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
करुणा शर्मा यांचा पाठिंबा
करुणा शर्मा यांनी या महिलेची बाजू घेताना म्हटले, “महाराष्ट्रात सध्या महिलांना बदनाम करण्याचा डाव सुरू आहे. या महिलेवर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला, आणि तक्रार केल्यावर तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. रक्षकच भक्षक बनले आहेत.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ न्यायाची मागणी केली. तसेच, त्या म्हणाल्या, “मी गेल्या तीन महिन्यांपासून महिला आयोगाकडे तक्रारी करत आहे, पण काहीच कारवाई झाली नाही. मी 10-12 वेळा मुख्यमंत्र्यांच्या पीएमार्फत भेटीची वेळ मागितली, पण ती मिळाली नाही.”





